भिंतीला कान : फडणवीस-राऊत काय बोलले?- दिल्लीत धक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:31 AM2020-10-01T01:31:32+5:302020-10-01T01:32:04+5:30

‘दक्षिणेतल्या मोदीं’चा भाजपमध्ये उदय आणि नरेंद्र मोदींच्या वाढलेल्या दाढीचे रहस्य!

Ears on the wall: What did Fadnavis-Raut say? - Shocks in Delhi | भिंतीला कान : फडणवीस-राऊत काय बोलले?- दिल्लीत धक्के

भिंतीला कान : फडणवीस-राऊत काय बोलले?- दिल्लीत धक्के

Next

हरीष गुप्ता

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात तब्बल १५० मिनिटे चाललेल्या भेटीचे धक्के नंतरही जाणवत राहिले, अगदी दिल्लीतही पोहोचले. भाजपचे ज्येष्ठ नेते या भेटीवर अभ्यासपूर्ण मौन बाळगून आहेत. फडणवीस यांना बिहार निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे एवढेच काय ते या नेत्यांनी सांगितले. सुस्वभावी सरोज पांडे यांच्यानंतर महाराष्ट्राचा कारभार पाहील असा सरचिटणीस भाजपने दिलेला नाही. पक्षाला महाराष्ट्रात सत्तेचा वास येऊ लागला आहे, असे तर नाही ना? पक्षाला काही घाई नाही आणि विद्यमान सरकार अंतर्गत विरोधाभासातून आपल्याच कर्माने पडेल असे भाजपला वाटते. मग फडणवीस- राऊत यांच्यात १५० मिनिटांची भेट कशासाठी? शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’साठी राऊत यांना फडणवीस यांची मुलाखत घ्यायची आहे; आणि ती कशी घ्यायची हे ठरवायला हे दोघे भेटले यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. भेटीत राजकारणावर चर्चा झाली नाही असे फडणवीस म्हणाले, तेही कोणी खरे मानत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची सतरंजी काढून घेण्याची तयारी झाली आहे की काय? गेल्या आठ महिन्यात उद्धव ठाकरे अगदीच मोजक्या वेळी घराबाहेर पडले आहेत. अर्थव्यवस्था त्यांना हाताळता आलेली नाही असे त्यांचे टीकाकार म्हणतात. महाराष्ट्रात शरद पवार सत्तेची फळे चाखत आहेत, उद्धव ठाकरेही बहार उतरवत आहेत असेही ही मंडळी म्हणतात. संजय राऊत यांना ठाकरे यांनीच एखाद्या गुप्त मोहिमेसाठी दूत म्हणून पाठवले असेल काय? तसे तर दिसत नाही.. मग राऊत यांचा हा एकपात्री प्रयोग होता का? राजकीय निरीक्षकांच्या मते राऊत हे सध्या स्वत:चेच राजे झाले आहेत.
दुसरी फार गवगवा न झालेली भेट देशातले नंबर दोनचे शक्तिशाली नेते अमित शाह आणि आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची होती. त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. २ आॅगस्टपासून संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेल्या गृहमंत्र्यांनी जगन यांच्याशी बराच वेळ बोलणी केली. आधी त्यांनी दोनदा जगन यांना भेट नाकारली; पण यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून निरोप आल्यावर शाह यांनी वेळ दिला. जगन यांना पोलावरम प्रकल्पासाठी निधी, जीएसटीची भरपाई अशा काही गोष्टी हव्या होत्या. शिवसेनेनंतर अकाली दल एनडीए सोडून गेल्याने शाह चिंतेत आहेत. वायएसआर रेड्डी काँग्रेस एनडीएमध्ये येण्यासाठी शाह यांनी जगन यांच्यावर जाळे टाकायला सुरुवात केली आहे. तेलगू देशमचे नेते चंद्राबाबू आघाडीत पुन्हा येऊ इच्छितात; पण भाजपला वायएसआर काँग्रेसबरोबर नवा डाव खेळायचा आहे असे शाह यांनी जगन यांना सांगितल्याचे कळते. जगन यांच्या पक्षाची मतपेढी ख्रिश्चन, मुस्लीम समुदायाशी जोडलेली असल्याने त्यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली नाही असे कळते. गरज पडेल तेव्हा पाठिंबा द्यायला ते तयार आहेत. अमित शाह यांना हे मान्य न झाल्याने बैठकीचा फज्जा उडाला.

‘दक्षिणेतल्या मोदीं’चा उदय
बी. एल. संतोष हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का?- नसेल तर होणारे नुकसान तुमचे असेल. भाजपच्या क्षितिजावरचे हे उदयोन्मुख नाव. पंतप्रधानांइतके वलयांकित नसले तरी सत्तारूढ पक्षातले काही लोक त्यांना दक्षिणेतील नरेंद्र मोदी म्हणतात. या संतोष यांनी २००८मध्ये कर्नाटकात भगवा फडकवला. मोदींनी केशुभाई पटेल यांना गादीवर बसवले तसे संतोष यांनी येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. तेव्हापासून संतोष यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आता ११ वर्षांनंतर पक्षाने त्यांना सरचिटणीसपद दिले आहे. केमिकल इंजिनिअर, अविवाहित आणि सर्वकाळ संघ कार्यकर्ते असलेले संतोष काम उत्तम जाणतात, तंत्रस्नेही आहेत. त्यांच्याकडे नवनव्या कल्पना असतात. देशभक्तीची प्रेरणा पक्षकार्यकर्त्यांमध्ये कशी रुजवता येईल हे समजून घेण्यासाठी शाहरूख खान यांचा ‘चक दे इंडिया’ त्यांनी १० वेळा पाहिला. भाजपात नुकतीच झालेली कामाची वाटणी मोदी, शाह, नड्डा या त्रिकुटाने केली. मात्र चार शक्तिशाली सरचिटणीस आणि सात उपाध्यक्षांना बाहेरचा रस्ता दाखवण्यामागे बी.एल. संतोष होते. अर्थात काहींना मंत्रिमंडळात घेतले जाईल, काही राज्यपाल होतील. भाजपला जर पाच महत्त्वाची दक्षिणी राज्ये, ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये २०२४ साली सत्ता हवी असेल तर नव्या रक्ताला वाव दिला पाहिजे हे संघश्रेष्ठींना पटवून देण्यात संतोष यशस्वी झाले आहेत.

मोदींच्या दाढीचे रहस्य काय?
मोदी सध्या दाढी का वाढवत आहेत? - दिल्लीत सध्या याबद्दल सगळे बोलतात; पण या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. अगदी मोदींच्या निकटवर्तीयांकडेही नाही. कोविडमुळे पंतप्रधानांना अगदी जवळ कोणी नको आहे असा एक खुलासा केला जातो. दाढी करायला गेलेल्या माणसाकडून संसर्ग होऊ शकतो. म्हणून प्रत्येकालाच हातभर अंतरावर ठेवले जाते आहे. अगदी त्यांच्या घरी काम करणाऱ्यांनाही. कोरोनाशी लढायला ‘दैवी’ मदत मिळवण्यासाठी या वाढत्या दाढीचा काही संबंध आहे अशीही कुजबूज ऐकायला मिळते आहे...

(लेखक लोकमत समुहात नॅशनल एडिटर आहेत, नवी दिल्ली)

Web Title: Ears on the wall: What did Fadnavis-Raut say? - Shocks in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.