coronavirus: विद्यापीठ परीक्षा न घेणे योग्य ठरेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:25 AM2020-05-15T01:25:56+5:302020-05-15T01:26:41+5:30

परीक्षा ही एक चाचणी आहे. बहुतांशी हा शब्द व्यक्तींच्या मूल्यांकनासाठी वापरला जातो. विद्यार्थिदशेत परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विद्या आणि बुद्धी अधिक तल्लख होते. परीक्षा नसेल तर आपण मिळविलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अर्थ आपल्याला योग्यरीतीने समजला की नाही, हे कळणे अशक्यच आहे.

coronavirus: Would it be better not to take university exams? | coronavirus: विद्यापीठ परीक्षा न घेणे योग्य ठरेल?

coronavirus: विद्यापीठ परीक्षा न घेणे योग्य ठरेल?

Next

- प्रा. डॉ. संजय खडक्कार
(माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ)

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्याच्या ६० वर्षांच्या इतिहासात सर्व विद्यापीठांमध्ये अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्याच फक्त परीक्षा होणार आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता मागील सत्राचे गुण आणि अंतर्गत गुणांच्या आधारे गुण देऊन पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे महाराष्टÑात उच्चशिक्षण घेणाऱ्या जवळपास ३४ लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त ८-९ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आणि बाकीचे विद्यार्थी परीक्षेविनाच पुढील वर्षात जाणार. आता २५ लाख विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता नाही. नापास होण्याची चिंताच नाही. परीक्षा नसण्याचा विचार किती सुखावह वाटतो; पण तो खरंच तसा आहे काय?

परीक्षा ही एक चाचणी आहे. बहुतांशी हा शब्द व्यक्तींच्या मूल्यांकनासाठी वापरला जातो. विद्यार्थिदशेत परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विद्या आणि बुद्धी अधिक तल्लख होते. परीक्षा नसेल तर आपण मिळविलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अर्थ आपल्याला योग्यरीतीने समजला की नाही, हे कळणे अशक्यच आहे. परीक्षेमुळेच विद्यार्थी कठोर परिश्रम करून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात, त्यावेळचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाची पातळी वाढते. अधिक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी तसेच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी परीक्षा ही एकप्रकारची स्पर्धाच आहे. परीक्षेमुळेच विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन होते. ज्ञान, क्षमता आणि धैर्य यांचे मोजमाप होते.

जीवनाच्या प्रत्येक चरणामध्ये आपण नवीन नवीन परिस्थितीचा सामना करतो आणि त्यापासून काही शिकत असतो. परीक्षा हा एक प्रमुख मार्ग आहे. जीवनात दडपणामध्ये आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याची क्षमता परीक्षेद्वारेच विकसित होते. वेळ, व्यवस्थापनेचे धडेदेखील परीक्षेच्या माध्यमातून आपण शिकत असतो. परीक्षेमुळेच तर्कशास्त्र, विचार करण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता विकसित होते. व्यक्ती सामर्थ्य आणि त्याचे कमकुवतपण याचे मूल्यमापन परीक्षेद्वारेच समजू शकते. एकंदरीत विद्यार्थ्यास स्वत:ला सिद्ध आणि विकसित करण्यासाठी परीक्षा ही आवश्यकच असते.

परीक्षेचा एक वेगळाच माहोल असतो. परीक्षा केंद्रावर घाईगडबडीत पोहोचणे. कोणत्या वर्गखोलीत आपला आसन क्रमांक आहे ते शोधणे. त्यानंतर वर्गखोलीत कोणत्या डेस्कवर आपला आसन क्रमांक आहे ते पाहणे. तेथे स्थानापन्न होणे. उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वी, जो काही आपण अभ्यास केलाय, तो आपण विसरलो आहे असे मनात येणे. उत्तरपत्रिका सोडवून बाहेर आल्यावर एका कर्तव्यपूर्तीचा वेगळाच आनंद मिळणे, आदी सर्व गोष्टींना आता परीक्षा नसल्याने २५ लाख विद्यार्थी मुकणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांत परीक्षेसंबंधी कार्यक्रम व अभिनवपद्धती अवलंबिण्याचा सल्ला दिला आहे. त्यात परीक्षेचा कालावधी तीन तासांऐवजी दोन तास करण्याचे सुचविले आहे. परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने, बहुपर्यायी प्रश्नावली (एमसीक्यू)द्वारे, ओपन बुक पद्धतीनेदेखील घेऊ शकता, हे सुचविले आहे. ‘कोविड-१९’ची स्थिती आणि इतर घटकांचे सर्वंकष आकलन केल्यानंतर सर्वच सत्रांच्या परीक्षा आयोगाने सूचित केल्या आहेत. परिस्थिती सामान्य होण्याची चिन्हे नसल्यास अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मागील सत्राच्या आणि अंतर्गत गुणांच्या आधारावर गुण द्यावेत, असा शेवटचा पर्याय म्हणून आयोगाने सुचविले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना असे दिलेले गुण मान्य नसतील, त्यांच्या परीक्षा विद्यापीठांनी १२ दिवसांत घ्याव्या, असे आयोगाने केलेल्या शिफारशीत म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, विद्यापीठांना सर्वच सत्रांच्या परीक्षा घ्याव्यात म्हणूनच विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै या काळात (शासनाच्या शिफारशीप्रमाणे) घेऊन बाकी सर्वच परीक्षा सोयीनुसार पुढील चार महिन्यांत घेतल्या असत्या, तर अधिक उचित झाले असते.

आज जरी अंतिम वर्ष सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेणे सोयीचे आणि सुखावह वाटत असले तरी तो निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. २०१४ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १००व्या दीक्षांत समारंभाच्या वेळेस विद्यार्थ्यांना मिळालेल्या अंतर्गत गुणांसंबंधी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यांच्या पदवीविषयी शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपतींनी दीक्षांत समारंभास येण्याचे टाळले होते. हा ताजा अनुभव लक्षात घेऊन विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा आता घेऊन परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर इतर सर्वच परीक्षा स्मार्टपद्धतीने घ्यावात, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

Web Title: coronavirus: Would it be better not to take university exams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.