नव्याचा ध्यास घेतल्यानेच विद्यापीठे तरतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:15 AM2020-07-03T00:15:03+5:302020-07-03T00:15:18+5:30

विद्यापीठांमधून रोजगारक्षम शिक्षण दिले जात नसल्याची उद्योगधुरिणांची जुनीच तक्रार आहे. सखोल व समग्र ज्ञानाऐवजी विद्यापीठे संशोधनावर अवास्तव भर देतात.

Article on Universities will survive only by focusing on the new! | नव्याचा ध्यास घेतल्यानेच विद्यापीठे तरतील!

नव्याचा ध्यास घेतल्यानेच विद्यापीठे तरतील!

Next

डॉ. एस. एस. मंठा

शिक्षण ही विद्या व ज्ञानाच्या संप्रेषणाची पद्धत आहे. गुरूने शिष्याला ज्ञान देण्याची ही पद्धत काळानुसार नेहमीच बदलत आहे. इसवी सन आठव्या शतकात होऊन गेलेल्या आदिशंकराचार्यांचे पद्मपाद, हस्त मलाका, त्रोटकाचार्य व सुरेश्वर हे चार शिष्य होते. गुरूप्रमाणेच हे शिष्यही प्रकांड बुद्धिमान होते. वेदकाळापासून चालत आलेल्या गुरू-शिष्य परंपरेचे पालन करत त्यांनी अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी भारतवर्षाच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले. ते आध्यात्मिक हिंदू परंपरेचे आधारस्तंभ आहेत. महाभारत त्याच्या आधी म्हणजे इसवीपूर्व ३०६७ मध्ये घडले. महाभारतानेही शिक्षण पद्धतीत बदल करण्यात मोठी भूमिका बजावली. निशाधचा राजपुत्र असलेल्या एकलव्याला गुरू द्रोणाचार्यांनी त्या काळी रूढ असलेल्या सामाजिक क्षुद्रतेच्या कल्पनेतून शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला; तरीही आज ज्याला डिस्टन्स वा आॅनलाईन लर्निंग म्हणता येईल, त्या पद्धतीने एकलव्य धनुर्विद्येत पारंगत झालाच. ‘कोविड-१९’च्या निमित्ताने आधुनिक शिक्षणपद्धतीसही अशीच आमूलाग्र कलाटणी मिळेल का? तसे झाल्यास भविष्यातील विद्यापीठे कशी असतील?

How Finland built the world

विद्यापीठ हा अध्यापक व विद्वानांचा समुदाय असतो. तेथे ज्ञानोपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य असायलाच हवे. त्यामुळे काळानुरूप पद्धत बदलली तरी विद्यापीठाचे मूळ हेतू व उद्देश कायम राहायलाच हवेत. विद्यार्जन हे माध्यम आहे व त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परिश्रमाचे पदवी हे फळ असते. अनेक गोष्टींमुळे विद्यापीठ शिक्षणाचे स्वरूप बदलते आहेच. यापैकी काही बाबी म्हणजे विद्यार्थ्यांची अवाढव्य संख्या, अध्यापकांची कमतरता व त्यांची सुमार पात्रता, शिकून बाहेर पडूनही उपलब्ध नसलेल्या नोकºया, आदी. त्यात आता ‘कोविड’ची भर पडली आहे. या प्रत्येत बाबीचा वापर आपण चांगल्यासाठी करून घ्यायला हवा.

विद्यापीठांमधून रोजगारक्षम शिक्षण दिले जात नसल्याची उद्योगधुरिणांची जुनीच तक्रार आहे. सखोल व समग्र ज्ञानाऐवजी विद्यापीठे संशोधनावर अवास्तव भर देतात. विद्यापीठांचे व्यवस्थापन व अध्यापकवर्गाला दिले जाणारे पगार हेही ज्ञानोपासक वातावरणास पोषक नाहीत. मंजूर होणे व परतफेड या दोन्ही दृष्टीने शैक्षणिक कर्ज ही मोठी समस्या आहे. विद्यापीठ शिक्षणावर होणारा खर्च व त्यातून मिळणारे फलित यांचाही मेळ बसत नाही. समाजाच्या गरजा व तंत्रज्ञान या दोन्ही बाबतीत विद्यापीठे मागे पडतात. भविष्यातील विद्यापीठांमध्ये संमिश्र पद्धतींची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. भविष्यातील शिक्षण काही प्रमाणात आॅनलाईन असणार आहे. अशा शिक्षणात विद्यार्थ्यांची गती पाहून त्यानुसार प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाचे स्वरूप आणि प्रमाण ठरवावे लागेल.

Teacher

आधुनिक उद्योग व त्यातील प्रचंड स्वचालन तंत्रज्ञान यानुसारच श्रमशक्तीही असावी लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स, क्लाऊड टेक्नॉलॉजी, डेटा अ‍ॅनॅलिटिक्स हे आताचे परवलीचे शब्द आहेत. प्रत्यक्ष मानवी काम व संगणकीय प्रणाली यांच्यात योग्य समन्वयाची ‘सायबर फिजिकल सिस्टीम’ खोलवर रुजली आहे. भविष्यात माणसे फक्त यंत्र चालविणार नाहीत, तर त्यांच्याशी संवाद साधू लागतील. त्यातून ‘इंटरनेट आॅफ पीपल’ व ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’चे सुंदर संमित्र विश्व उदयास येईल. हे सर्व परिवर्तन हात धरून पुढे नेऊन ते समाजात रुजविण्याची भूमिका विद्यापीठांनाच पार पाडायची आहे.

Education stories - ET Prime

भविष्यात गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, तीक्ष्ण विचारशक्ती, सृजनात्मकता, माणसांचे व्यवस्थापन, बुद्धीला भावनेचीही जोड देणे, अचूक निर्णय घेणे, आदी नव्या युगाची कौशल्ये आवश्यक असणार आहेत. यापैकी प्रत्येक कौशल्य विद्यापीठाच्या चार भिंतींच्या आत राहून देता येईलच असे नाही. त्यामुळे कॅम्पसएवढेच शिक्षण बाहेरही द्यावे लागेल. यासाठीची योग्य व दर्जेदार साधने आॅनलाईन व आॅफलाईन सर्वांना सहज उपलब्ध करावी लागतील. ही साधने संवादात्मक, थेट मुद्दे मांडणारी, मोबाईलवर वापरता येणारी व भावनेला चटकन हात घालू शकतील, अशी हवीत. कोर्सेरा, यूडेमी, यूडॅसिटी, लिंक्डइन, एडएक्स व फ्युचरलर्न यांसारख्या जागतिक पातळीवरील साधनांच्या भाऊगर्दीमुळे विद्यार्थी व अध्यापकही गोंधळून गेले आहेत. भविष्यातील विद्यापीठ शिक्षणाचे स्वरूप संमिश्र असेल. बºयाच प्रयोगाअंती कदाचित आॅनलाईन व आॅफलाईनचे ३०:७० किंवा ४०:६० हे प्रमाण सोयीचे होईल. त्यामुळे भविष्यातील विद्यापीठांच्या रचनात्मक ढाच्यात बदल करावा लागेल, वेगळे व्यावसायिक मॉडेल विकसित करावे लागेल, विज्ञाशाखांत निरंतर समन्वयाची व्यवस्था करावी लागेल. अध्यापकांनाही बदल आत्मसात करावे लागतील. रँकिंग, रेटिंग व अ‍ॅक्रेडिशनच्या कालबाह्य कल्पनांचा त्याग करून दर्जेदार शिक्षण हा विद्यापीठांचा अंगभूत भाग व्हावा लागेल. परीक्षा व पदव्यांच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल करावा लागेल. हवे ते विषय एकत्र करून कुवतीनुसार कमी-अधिक वेळात पदवी घेण्याची सोय करावी लागेल. व्हर्च्युअल शिक्षणासाठीही अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घ्यावा लागेल. शिक्षकांना गाईड व मेंटॉर व्हावे लागेल.

Classroom Solutions for STEM and STEAM | LEGO® Education

विद्यापीठांना देशापुढील प्रश्न सोडविण्याची व गरजा भागविण्याची उद्योगांच्या निकट सहकार्याने चालणारी समस्या निवारण केंद्रे व्हावे लागेल. विद्यापीठांचे ‘फंडिंग मॉडेल’ बदलावे लागेल. विद्यार्थ्यांना मान मोडेपर्यंत खर्डेघाशी करायला लावून भागणार नाही. इतरांशी चर्चा करून व अवांतर वाचन करून स्वत:चा विचार विकसित करण्यासाठी व मनाची कवाडे रुंदावण्यासाठी त्यांना मोकळा वेळ द्यावा लागेल. त्यातूनच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी परिपूर्ण जीवन जगण्याची कुंजी मिळू शकेल.

(लेखक भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत)

Web Title: Article on Universities will survive only by focusing on the new!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.