लेख: गुरुकुल २.०: संगम परंपरेचा आणि भविष्याचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 07:57 IST2026-04-19T07:55:35+5:302026-04-19T07:57:29+5:30
गुरुकुल पद्धतीची मॉडेल्स अपवाद म्हणून न पाहता धोरणात्मक दिशादर्शक म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात, जिथे शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे, तिथे एकात्मिक, समावेशक आणि भविष्याभिमुख शिक्षणसंस्थांची उभारणी ही केवळ गरज नसून अनिवार्यता बनली आहे. यासाठी केवळ धोरणात्मक घोषणा नव्हे, तर ठोस आणि परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे.

लेख: गुरुकुल २.०: संगम परंपरेचा आणि भविष्याचा
राजन वेळुकर
माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
रताच्या शिक्षणव्यवस्थेवर सातत्याने चर्चा होत असताना ‘गुरुकुल’ ही संकल्पना अनेकदा पुढे येते- बहुतेकवेळा एक आदर्श; पण कालबाह्य ठरलेला नमुना म्हणून. मात्र, अलीकडे एका आधुनिक गुरुकुल स्वरूपाच्या श्री सत्य साई युनिव्हर्सिटी फॉर ह्युमन एक्सलेन्स या शिक्षणसंस्थेचा जवळून अनुभव घेतल्यानंतर, ही संकल्पना केवळ पुनरुज्जीवनाची नव्हे, तर पुनर्रचनेची असल्याचे दिसले.
या संस्थेची शैक्षणिक रचना माध्यमिक शिक्षणापासून ते संशोधन पदवी (पीएच.डी.)पर्यंत विस्तारलेली असली, तरी तिचा खरा केंद्रबिंदू ‘सर्वांगीण मानवी विकास’ हा आहे. येथे शिक्षण हे केवळ माहितीचे संकलन किंवा कौशल्य विकासापुरते मर्यादित राहात नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुआयामी घडणीचा सुसंवादी प्रवास घडवते. पायाभूत सुविधांच्या बाबतीतही ही संस्था अत्याधुनिक मानदंड पूर्ण करते. आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वर्गखोल्या, विस्तीर्ण क्रीडांगणे आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी आवश्यक सर्व सुविधा येथे आहेत. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करण्यावर येथे भर दिला जातो. विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे देण्यात आलेल्या लॅपटॉपचा वापर दिवसातून मर्यादित (दीड तास) वेळेसाठीच ठेवण्यात येतो, तर मोबाइलचा वापर पूर्णतः निषिद्ध आहे. डिजिटल साधनांवरील अवलंबित्व कमी करून एकाग्रता, सखोल अध्ययन आणि मानवी संवाद यांना प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न आजच्या ‘अटेन्शन इकॉनॉमी’मध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या संस्थेचा सर्वांत प्रभावी पैलू म्हणजे तिची सामाजिक समावेशकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची सहावीपासून निवड करून त्यांना पूर्णतः निवासी शिक्षणाची संधी दिली जाते. शिक्षण, निवास, वस्त्र आणि दैनंदिन गरजा- सर्व काही संस्थेद्वारे पुरवले जाते. ही केवळ शिष्यवृत्ती योजना नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेली एक व्यापक प्रणाली आहे, जी सामाजिक गतिशीलतेला नवे आयाम देते.
शंभर सदस्यांचा ऑर्केस्ट्रा बँड
ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेले महिला महाविद्यालयही विशेष उल्लेखनीय आहे. येथील विद्यार्थिनींचा आत्मविश्वास, ज्ञानाची सखोलता आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती पाहता त्यांच्या क्षमताविकासाचा ठसा उमटतो. सुमारे शंभर सदस्यांचा ऑर्केस्ट्रा बँड ही केवळ कलात्मक कामगिरी नसून शिस्त, समन्वय आणि सामूहिकतेचे प्रतीक आहे. या बँडची नोंद गिनिज बुकमध्ये झाल्याने संस्थेच्या गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे.
काय आहेत या मॉडेलची खास वैशिष्ट्ये?
पालकांशी संपर्कासाठी संवेदनशील आणि संतुलित व्यवस्था: ठराविक कालावधीनंतर पालकांना भेटीची संधी आणि दीर्घ सुटीमध्ये घरी जाण्याची मुभा देण्यात येते. यामुळे विद्यार्थी संस्थात्मक जीवनात पूर्णपणे समाविष्ट होतात, तरीही त्यांच्या कौटुंबिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत नाही.
शिक्षणानंतर रोजगाराची हमी: पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थेमध्येच पाच वर्षांपर्यंत पगारी नोकरीची संधी दिली जाते. शिक्षण ते रोजगार या संक्रमणातील अनिश्चितता कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जात आहे.
संस्थेअंतर्गत कार्यरत वैद्यकीय महाविद्यालय आणि अत्याधुनिक रुग्णालय: वैद्यकीय शिक्षण विनामूल्य असले तरी प्रवेशासाठी गुणवत्ता निकष (नीट परीक्षा) कठोर ठेवले आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालयात ‘नो बिलिंग काउंटर’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे, जिथे उपचार हा हक्क मानला जातो, व्यवहार नव्हे.