"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:58 IST2026-04-19T12:56:36+5:302026-04-19T12:58:40+5:30
हा संघर्ष केवळ लष्करी नाही तर काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे, येथे रणनीतीच्या बाबतीत अमेरिका अपयशी ठरली आहे, असेही गालिबाफ म्हणाले.

"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अत्यापही सुरूच आहे. यातच आता पुन्हा एकदा इराणने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. "इराण चर्चेसाठी तयार असला तरीही, अमेरिकेने एक छोटीशी चूकही केली, तरी त्यांना संपूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी म्हटले आहे.
"आम्ही मैदानात आमची ताकद सिद्ध केली, आता..." -
रविवारी टीव्हीवरून दिलेल्या संबोधनात गालिबाफ म्हणाले, "इराण सध्या 'हाय अलर्ट'वर आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आम्ही मैदानात आमची ताकद सिद्ध केली आहे. आता आम्ही मजबूत स्थितीतून चर्चा करू इच्छितो." दरम्यान, "अमेरिकेकडे इराणपेक्षाही अधिक पैसा, शस्त्रास्त्रे आणि अनुभव आहे. मात्र इराणने आपल्या रणनीतीच्या जोरावर परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवली आहे. हा संघर्ष केवळ लष्करी नाही तर काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे, येथे रणनीतीच्या बाबतीत अमेरिका अपयशी ठरली आहे," असेही गालिबाफ म्हणाले.
यावेळी गालिबाफ यांनी अमेरिकेचे धोरण आणि इस्रायलचा हस्तक्षेप यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "अमेरिका 'अमेरिका फर्स्ट'चा नारा देते. मात्र त्यांचे अनेक निर्णयांमध्ये इस्रायलची भूमिकाच अधिक दिसते. त्यांचे अनेक निर्णय इस्रायलकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीवर आधारलेले असतात."
'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर नाकेबंदी कायम ठेवण्याचे अमेरिकेचे संकेत -
"इराणला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे आणि तेल संपत्तीवर कब्जा करण्याचे विरोधकांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवले आहेत," असेही गालिबाफ म्हणाले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव कायम ठेवण्याचे आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर नाकेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात उभय देशांतील संघर्ष वाढणार की चर्चेतून मार्ग निघणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.