“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:35 IST2026-04-19T11:33:55+5:302026-04-19T11:35:05+5:30
DCM Eknath Shinde News: शिवसेना या लढाईमध्ये एनडीए सरकारच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर असेल, हे मात्र नक्की, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
DCM Eknath Shinde News: काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिलांना बसला. या साऱ्या घटना २१व्या शतकातील महिला पाहात आहेत आणि त्या योग्यवेळी उत्तर देतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालीच महिलांना त्यांचा हक्क आणि स्वाभिमान मिळणार यात काही शंकाच नाही. शिवसेना या लढाईमध्ये एनडीए सरकारच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर असेल, हे मात्र नक्की, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
विरोधकांनी आनंद व्यक्त करणे ही अत्यंत खेदजनक बाब
लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर करून देशातल्या महिलांचा अपमान करणारी जी घटना घडली, त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे. महिलांचे अधिकार हिरावले जात असताना विरोधकांनी आनंद व्यक्त करणे ही अत्यंत खेदजनक बाब होती. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे, हा केवळ एका विधेयकाचा पराभव नाही, तर नारीच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे, पण हा अडथळा फार काळ राहणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड झाले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.