"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:38 IST2026-04-19T12:35:37+5:302026-04-19T12:38:19+5:30
अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे.

"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर/देवगाव: कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो, घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो, असे सांगून लोकांची फसवणूक करणारा व पैसे उकळणारा संगमनेर तालुक्यातील भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याला पोलिसांनी गजाआड केले.
या बाबासोबत डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगाव पान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधुकर शिंदे (दोघेही रा. रहिमतपूर, ता. संगमनेर) या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी बाबाचे युट्यूब चॅनेलवरचे अंधश्रद्धामूलक व्हिडीओ, तसेच बाबाने गवांदे यांचेसह पोलिसांविरोधात खंडणीबाबतचे बदनामीचे जे व्हिडीओ बनविले तेही पुरावा म्हणून दिले आहेत.
शुक्रवारी (दि. १७) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली. या बाबाने ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनेल स्वत:च्या जाहिरातीसाठी सुरू केले होते. त्यावरील व्हिडीओमध्ये दुर्धर आजार बरे करण्याचे दावे तो करत होता. लोकांकडून ११ हजार, २१ हजार, ५१ हजार अशा रकमा तो घेत होता. माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, असे भासवून त्याने आसपासच्या परिसरात दहशत निर्माण केली आहे, असेही गवांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.