लेख: चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले शोधण्याचे कौशल्य आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 08:29 IST2026-05-13T08:27:18+5:302026-05-13T08:29:09+5:30

‘टोकाचे चांगले’ किंवा ‘टोकाचे वाईट’ अशा भूमिका घेऊन नागरिक भांडत राहिले तर राज्यकर्त्यांना आपला स्वार्थ सहज साधता येऊ शकतो.

Article: Do you have the skill to find the bad in the good and the good in the bad? | लेख: चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले शोधण्याचे कौशल्य आहे?

लेख: चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले शोधण्याचे कौशल्य आहे?

-डॉ. हमीद दाभोलकर (मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस)
मानवी वर्तन किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना फारच कमी वेळा पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट यामध्ये विभागता येतात. बहुतांश वेळा आपले वास्तव चांगले आणि वाईट यांच्या विविध टक्केवारीच्या मिश्रणातून बनत असते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ‘चांगल्यामधले वाईट काय आहे?’ आणि ‘वाईटामध्ये त्यातल्या त्यात चांगले काय आहे?’ हे वेगळे करण्याचे कौशल्य अत्यंत आवश्यक आहे.

वर्तमान कालखंडात बहुतांश गोष्टींविषयी दोन धृवांसारख्या वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. ‘पोलरायजेशन’ हे प्रमुख राजकीय हत्यार म्हणून वापरले जाते आहे. नागरिकांनी ‘टोकाचे चांगले’ किंवा ‘टोकाचे वाईट’ अशा भूमिका घेऊन एकमेकांशी हिरीरीने भांडावे त्यामुळे मग राज्यकर्त्यांना आपला स्वार्थ सहज साधता येऊ शकेल अशा स्वरूपाचे हे राजकारण आहे.

या राजकारणाला जर आपल्याला बळी पडायचे नसेल तर आपल्याला चांगल्यामधले वाईट आणि वाईटातले चांगले शोधता आले पाहिजे. कधी कधी वाईट गोष्ट चांगुलपणाच्या आड लपलेली असते. आपल्याला आवडणारे बोलणे, मदत करण्याची आश्वासने यांच्या मागे अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचा वेगळाच स्वार्थ दडलेला असतो. फक्त बाह्य चमक पाहून निर्णय न घेता, सत्य आणि परिणाम समजून घेतले तर चांगल्या गोष्टींमधील वाईट ओळखता येते. तसेच ज्या गोष्टीमध्ये खूप चांगले असते, त्यामधले थोडेसे वाईट लगेच दिसत नाही. ते शोधण्यासाठी शांतपणे आणि विचारपूर्वक निरीक्षण करणे गरजेचे असते. 

छोट्या चुका किंवा गैरफायदे दुर्लक्षित न करता त्याकडे लक्ष दिले, तर चांगल्या गोष्टीमधील वाईट सहज ओळखता येते. चांगल्या गोष्टींमधले वाईट समजून घेण्याची आपली क्षमता विकसित झाली तर मग कोणाही व्यक्तीचे दैवतीकरण आपल्याकडून होण्याची शक्यता कमी होते. वाईट गोष्टीमध्येही काही शिकण्यासारखे किंवा चांगले दडलेले असू शकते. कठीण प्रसंग माणसाला अधिक मजबूत, सावध आणि समजूतदार बनवतात. अपयशातून अनुभव मिळतो, चुका सुधारण्याची संधी मिळते आणि योग्य मार्ग निवडण्याची जाणीव होते.

एक उदाहरण पाहूया. अलीकडे भारतात विविध राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणावर मोफत योजना, सवलती आणि आर्थिक मदतीची आश्वासने दिली. या गोष्टीतील चांगला भाग असा की गरीब, शेतकरी, महिला आणि बेरोजगार लोकांना काही प्रमाणात आधार मिळतो. अनेक लोकांना शिक्षण, आरोग्य आणि प्रवासाच्या सुविधा मिळतात. पण त्यामधले वाईट असे की काही वेळा लोकांच्या खऱ्या समस्या सोडविण्यापेक्षा फक्त मते मिळविण्यासाठी अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे लोक दीर्घकालीन विकास, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे कमी लक्ष देतात. सरकारवर आर्थिक ताणही वाढू शकतो.

कोणतीही राजकीय गोष्ट पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. आपण फक्त आकर्षक घोषणा न पाहता, त्याचे परिणाम, उद्देश आणि समाजावर होणारा प्रभाव समजून घेतला पाहिजे. विवेकबुद्धीने विचार केला तर चांगल्यामधले वाईट आणि वाईटामधले चांगले ओळखता येते. आपण स्वत:, आपले कुटुंब आणि आपला समाज अधिक चांगला होण्यासाठी हे अतिशय आवश्यक कौशल्य आहे.

hamid.dabholkar@gmail.com

Web Title : अच्छे में बुरा, बुरे में अच्छा ढूंढने का कौशल।

Web Summary : अच्छे और बुरे को समझकर मिश्रित वास्तविकताओं को पहचानें। स्थितियों का आलोचनात्मक आकलन करके राजनीतिक ध्रुवीकरण से बचें। गहरे निहितार्थों और दीर्घकालिक प्रभावों को समझने के लिए सतही आकर्षण से परे देखें। व्यक्तिगत और सामाजिक सुधार के लिए विवेक विकसित करें।

Web Title : Skill to find good in bad, bad in good.

Web Summary : Recognize mixed realities by discerning the good and bad. Avoid political polarization by critically assessing situations. Look beyond superficial charm to understand deeper implications and long-term impacts. Develop discernment for personal and societal betterment.