आजचा अग्रलेख: अधिकाऱ्यांची ही कसली भाषा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:22 IST2026-04-21T10:21:18+5:302026-04-21T10:22:13+5:30

राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकले पाहिजे, असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगायचे. मंत्री भरमसाठ आश्वासने देतात. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘तुझे काम करतो’, असे सांगतात. त्याउलट अधिकारी प्रत्येक गोष्टीत नकारघंटा वाजवतात. यावरून यशवंतराव चव्हाण यांनी अधिकाऱ्यांचे आणि राज्यकर्त्यांचे कान टोचले होते. जनतेची कामे झाली पाहिजेत.

Arrogance of Power? Mumbai MHADA Chief's Threatening Tone Sparks Major Controversy. | आजचा अग्रलेख: अधिकाऱ्यांची ही कसली भाषा?

आजचा अग्रलेख: अधिकाऱ्यांची ही कसली भाषा?

राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकले पाहिजे, असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगायचे. मंत्री भरमसाठ आश्वासने देतात. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘तुझे काम करतो’, असे सांगतात. त्याउलट अधिकारी प्रत्येक गोष्टीत नकारघंटा वाजवतात. यावरून यशवंतराव चव्हाण यांनी अधिकाऱ्यांचे आणि राज्यकर्त्यांचे कान टोचले होते. जनतेची कामे झाली पाहिजेत. ती नियमात कशी बसवायची हे अधिकाऱ्यांनी बघितले पाहिजे, असे दुसरे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणायचे. तर काम नियमात बसत नसेल, तर नियम बदलण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे तिसरे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले सांगायचे. विलासराव देशमुख महसूल मंत्री असताना लातूरच्या विश्रामगृहावर एक नागरिक त्याचे काम घेऊन आला. 

विलासरावांनी अधिकाऱ्याला बोलावून हे काम का होत नाही, असे विचारले. तो अधिकारी म्हणाला, साहेब, त्यांची फाइल नियमात बसत नाही. तेव्हा, विलासराव म्हणाले, फाइल नियमात बसवण्यासाठीच तुम्हाला बसवले आहे. फाइल नियमात बसवून घेऊन या. थोड्या वेळाने अधिकारी ती फाइल घेऊन आले, तेव्हा फाइल हातात धरून विलासराव म्हणाले, फाइल नियमात बसली आणि फाइलचे वजनही वाढलेले दिसत नाही. हे सगळे आठवण्याचे कारण ठरली मुंबई म्हाडाचे सर्वेसर्वा संजीव जयस्वाल यांची दमदाटी. तुम्ही घुसखोर आहात की नाही, हे सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर आणू नका, अशा भाषेत त्यांनी मुंबईत गोरेगाव येथील मोतीलाल नगरमध्ये झालेल्या सभेत रहिवाशांशी संवाद साधला. 

त्यातून वादाला तोंड फुटले. आपल्या मागण्यांची काही पोस्टर्स तरुणांनी सभेत त्यांना दाखवली. त्यावरून नाराज होत जयस्वाल यांनी, तुम्ही कुठून, कधी, केव्हा, कसे आलात, कोणत्या साली आलात, असे अनेक प्रश्न सभेतच विचारले. तुमचा जन्म कधी झाला, याचीदेखील मी माहिती घेतो. तू घुसखोर निघालास, तर इथूनच उचलून घेऊन जाईल, अशी धमकीची भाषा त्यांनी वापरली. अधिकाऱ्यांना ही भाषा शोभते की नाही, याचा निर्णय मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री घेतील. मात्र, म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांच्या व्यथा-वेदनांचा कधीतरी उद्रेक होणारच. तो मोतीलाल नगरच्या सभेत दिसून आला इतकेच. मुळात मुंबईत संक्रमण शिबिराचा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये जवळपास २० ते २२ हजार कुटुंबे राहतात. त्यात ८ हजार घरांमध्ये घुसखोर आहेत.

कुलाबा आणि सायन प्रतीक्षा नगर, विक्रोळी कन्नमवार नगर येथे म्हाडाचे सर्वात जुने संक्रमण शिबिर आहे. येथे सुरुवातीला चाळी होत्या. त्या पाडून येथे इमारती उभ्या आहेत. ही संक्रमण शिबिरे ६० ते ७० च्या दशकापासून आहेत. तुम्हाला चांगली घरे बांधून देऊ म्हणून त्यांची घरे पाडली गेली. त्यांच्यासाठी संक्रमण शिबिराच्या इमारती बांधल्या गेल्या. तेथे राहणाऱ्यांची दुसरी तिसरी पिढीदेखील याच संक्रमण शिबिरात राहत आहे. काही ठिकाणच्या संक्रमण शिबिरांची घरे पाहिली, तर अंगावर शहारे येतील अशी स्थिती आहे. या संक्रमण शिबिरांतील घुसखोरांचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. गेली अनेक वर्षे म्हाडाने हा विषय अत्यंत निष्काळजीपणाने हाताळला आहे. 

त्यामुळेच मोतीलाल नगर येथे म्हाडाकडून होणाऱ्या पुनर्विकासावर लोकांनी प्रश्न उपस्थित केले, तर त्यांची उत्तरे त्यांना दिली पाहिजे. फलक दाखवणाऱ्या तरुणांना जे प्रश्न जयस्वाल यांनी विचारले, ते प्रश्न त्यांच्या अधिकाऱ्यांनी ८ हजार घरांमधील घुसखोरांना वेळोवेळी विचारले असते, तर हे प्रश्न चिघळले नसते. शिवाय लोकांचा या यंत्रणेवर विश्वास बसला असता. कमीत कमी २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ६० वर्षांपासून जर लोकांना संक्रमण शिबिरात राहावे लागत असेल, त्यांच्या घरांचा प्रश्नच मार्गी लागत नसेल, काही ठराविक बिल्डरच म्हाडामध्ये कारभार करत असतील, तर अशा घरांमध्ये राहणाऱ्यांच्याही सहनशीलतेला कधीतरी तोंड फुटणारच. संक्रमण शिबिरातील इमारतींचीच पुनर्बांधणी करण्याची वेळ आली असेल, तर अशा संतापाचा उद्रेक कधी ना कधी होणारच. 

त्यातून काही संतप्त तरुणांनी प्रश्न विचारले. त्यांना ‘तुला इथूनच उचलून घेऊन जाईल’ अशी भाषा वापरण्याची गरज होती का ?, अशी भाषा अधिकाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही. म्हाडामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सगळे म्हाडा अरबी समुद्रात नेऊन बुडवले पाहिजे, असे विधानसभेत बोलून दाखवले होते. ठराविक मुदतीत सिडको घर बांधून देऊ शकत असेल, तर म्हाडाला ते का जमत नाही, याचे आत्मपरीक्षण म्हाडा आणि तत्सम यंत्रणांनी करायला हवे.

Web Title : अधिकारियों की भाषा: क्या यह स्वीकार्य है?

Web Summary : म्हाडा अधिकारी की निवासियों के प्रति धमकी भरी भाषा से विवाद। घटना म्हाडा के संक्रमणकालीन आवास, भ्रष्टाचार और विलंबित पुनर्विकास परियोजनाओं के संचालन के भीतर गहरे मुद्दों को उजागर करती है, जवाबदेही पर सवाल उठाती है।

Web Title : Officials' Language: Is This Acceptable?

Web Summary : MHADA official's threatening language towards residents sparks controversy. The incident highlights deeper issues within MHADA's handling of transitional housing, corruption, and delayed redevelopment projects, raising questions about accountability.