आनंदची जबाबदारी पेलणारा खांदाच कुठे दिसत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:50 IST2026-05-16T12:30:58+5:302026-05-16T12:50:00+5:30
Anand Nadkarni: आज तो आपल्यात नसला, तरी त्याचे विचार, त्याची कला आणि त्याने जपलेली माणुसकी कायम स्मरणात राहील. त्याची उणीव कधीही भरून न निघणारी आहे.

आनंदची जबाबदारी पेलणारा खांदाच कुठे दिसत नाही
-डॉ. मोहन आगाशे
आनंद हे नाव जसं आनंद देणारं, तसंच त्याचं संपूर्ण आयुष्यही इतरांच्या आयुष्यात आनंद, संवेदना आणि विचारांची श्रीमंती पेरणारं होतं. त्याच्या जाण्याची बातमी मनाला अक्षरशः हादरवून टाकणारी आहे.
मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ऐकून आशा निर्माण झाली होती; पण अचानक त्याने आपल्याला सोडून जाणं अत्यंत वेदनादायी आहे. आनंद हा केवळ मनोविकारतज्ज्ञ नव्हता, तर तो बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी होता. लेखक, कवी, गायक, नाटककार, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता, छायाचित्रकार, संतसाहित्याचा अभ्यासक आणि उत्कृष्ट कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून त्याने अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. माणसांशी जुळून घेण्याची आणि त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटवण्याची त्याची शैली विलक्षण होती.
काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमात रसिकांनी उभं राहून दिलेली दाद ही त्याच्या प्रतिभेला मिळालेली खरी मानवंदना होती. आज तो आपल्यात नसला, तरी त्याचे विचार, त्याची कला आणि त्याने जपलेली माणुसकी कायम स्मरणात राहील. त्याची उणीव कधीही भरून न निघणारी आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे काय, हे समजलेल्या महाराष्ट्रामधील अत्यंत कमी लोकांपैकी डॉ. आनंद नाडकर्णी एक होता. आनंदने मनोविकास हा शब्द दिला आहे. आनंदचा संपर्क संपूर्ण महाराष्ट्रभर होता. त्याला अनेक गोष्टींमध्ये केवळ रुची नव्हती, तर ते जाणण्याची क्षमताही होती. स्वामी विवेकानंदांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांचा दांडगा अभ्यास होता. प्रत्येक गोष्टीचा मानसिक आरोग्यासाठी कसा संबंध आहे, हे उत्तमरीत्या विशद करून सांगण्याची कला त्याच्या अंगी होती.
अत्यंत साधी गोष्ट म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमाच्या गाण्यातून आपण आपल्या भावना कशा ओळखायच्या आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे? हे सांगणारा ‘फिल्मी नगमें अँड युवर इमोशनल कोशंट’ हा कार्यक्रम आम्ही दोघे काही वर्षांपासून करायचो. मागच्या महिन्यामध्ये आम्ही ठाण्यात शेवटचा कार्यक्रम केला.
अगदी सोप्या भाषेत, लोकांना कळेल अशा प्रकारे तो सांगायचा. त्याचे जाणे अत्यंत अघटित, अनपेक्षित आणि अकाली आहे. त्याच्या खूप योजना राहिल्या आहेत. उत्तम नेतृत्वगुण असलेल्या आनंदचा लोकसंग्रह दांडगा होता.
(लेखक ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)
सुमित्रा भावेंच्या सिनेमांवर उत्तम निरुपण
त्याच्याकडे अप्रतिम वक्तृत्वकला होती. आवाहन नावाच्या त्याच्या यूट्यूब वाहिनीवर मानसिक आरोग्यावर आधारलेल्या त्याच्या कितीतरी लहान-लहान फिल्म्स आहेत. आनंदबद्दलचे किस्से खूप आहेत. त्यातील एक सांगणे अवघड आहे. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे सर्वांत उत्तम रसग्रहण आनंद करायचा.
‘देवराई’ सिनेमानंतर ‘देवराईच्या छायेत’ हे पुस्तक आनंदने लिहिले. सुमित्रा भावेंनी मानसिक आरोग्यावर सहा चित्रपट केले. या सर्वांवर उत्तम निरुपण आनंद करायचा. या सर्व चित्रपटांवर आनंदने लिहावे असे मागच्या महिन्यातच आमचे बोलणे झाले; पण त्यापूर्वीच तो गेला. त्याच्या डोक्यात जेवढ्या कल्पना यायच्या तेवढ्या साकार करायला वेळ त्याच्याकडे नव्हता.
बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. नाडकर्णी एक शैलीदार ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेते, संगीतकार, तबलावादक, मर्मज्ञ संगीतप्रेमी, सूत्रसंचालक आणि तत्त्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक होते. २७ पेक्षा अधिक साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यात कादंबऱ्या, नाटके, कविता आणि मानसशास्त्रीय लेखनाचा समावेश आहे. वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.
डॉ. नाडकर्णी यांचा जन्म १९५८ मध्ये जळगाव येथे झाला. डॉ. नाडकर्णी यांना पोलिओ झाल्यामुळे लहानपणापासूनच संघर्ष पर्वाचा सामना करावा लागला. प्रखर प्रज्ञा, तीव्र संवेदनशीलता आणि सकारात्मक वृत्ती यांची देणगी लाभलेल्या डॉ. नाडकर्णी यांनी अत्यंत संयमाने, विवेकाने आणि धैर्याने या आजारावर मात केली. त्यांचे प्रारंभिक शिक्षण जळगाव, अंबेजोगाई, विलेपार्ले आणि ठाणे येथे झाले.
ठाणे कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली. त्यानंतर सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (१९८०) आणि केईएम रुग्णालयातून ‘डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल मेडिसिन’ पदविका आणि एमडी (मनोविकारशास्त्र) (१९८४) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एमडी परीक्षेत मुंबई विद्यापीठात ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर काही काळ त्यांनी ‘केईएम’मध्ये अध्यापनाचे काम केले.