१८ ते ४४ वयोगटासाठी जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:38 AM2021-05-07T04:38:04+5:302021-05-07T04:38:04+5:30

धुळे : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी ...

Start Vaccination Center at District Hospital for 18 to 44 year olds | १८ ते ४४ वयोगटासाठी जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करा

१८ ते ४४ वयोगटासाठी जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करा

Next

धुळे : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या प्रभातनगर येथील एकाच केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. १ मेपासून दररोज २०० लस दिल्या जात आहेत. एकच केंद्र असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास सहा लाख आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ होत आहे. गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातदेखील लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी निवेदनात केली आहे.

लसीकरणाच्या कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई होत असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. शहरातील नागरिकांनी लसीकरणाच्या बाबतीत व्यथा मांडल्या आहेत. आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत. जिल्हा रुग्णालयात केवळ कोविशिल्ड लसीचा पुरवठा होत आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी जोपर्यंत लसीकरण केंद्र सुरू होत नाही तोपर्यंत जिल्हा रुग्णालयास कोव्हॅक्सिन लस मिळणार नसल्याची माहिती मिळाली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

तसेच जिल्हा रुग्णालयात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सकाळी ८ वाजता सुरू न करता १० वाजेनंतर सुरू करण्यात येते. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत असून, गैरसोय होत आहे. सकाळी ६ वाजेपासून अन्नपाण्याशिवाय रांगेत उभे रहावे लागत आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या व्याधिंनी ग्रस्त नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ८ वाजेपासून लसीकरण सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी नगरसेवक मनोज मोरे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक राजेश पटवारी, उपमहानगरप्रमुख एजाज सय्यद, उपमहानगरप्रमुख संदीप सूर्यवंशी, माजी नगरसेवक संजय वाल्हे, उपमहानगरप्रमुख संजय जवराज, विभागप्रमुख भटू गवळी आदी उपस्थित होते.

Web Title: Start Vaccination Center at District Hospital for 18 to 44 year olds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.