Bills were issued in Dhule Zilla Parishad even though the work was not done | धुळे जिल्हा परिषदेत कामे झालेली नसतांनाही बिले काढली

धुळे जिल्हा परिषदेत कामे झालेली नसतांनाही बिले काढली

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून, कामे झालेली नसतांनाही खोटी बिले काढली जात असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच ज्या विषयांची चर्चाच झाली नाही, त्या विषयांवर सूचक,अनुमोदकांची नावे टाकण्यात आल्याचा आरोपही विरोधी सदस्यांनी केला. दरम्यान सभेत सर्व विषयांना बहुमताने मंजूरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर गोंदूर तलावा नजीक साई लक्ष्मी लॉन्स येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे होते. व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, समाजकल्याण सभापती मोगरा पाडवी, शिक्षण सभापती मंगला पाटील, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यावर चर्चा होत असतांना, विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी आक्षेप घेतला. मात्र त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सर्व विषयांना बहुमताने मंजूरी देण्यात आली.
भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला
सभेत जि.प.सदस्या सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हा परिषद भ्रष्टाचारात बुडालेली असल्याचा आरोप केला. त्यांनी फोटो व काही पुराव्यांची फाईल अध्यक्षांकडे दिली. त्यांनी सांगितले की आदिवासी शेष फंडामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झालेला आहे. शेष फंड १९-२० मध्ये एक कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. करवंद (ता. शिरपूर) येथे ग्रामपंचायत दरवाजाची दुरूस्ती दाखवून त्यासाठी ३ लाख ३१ हजाराचा खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात दुरूस्तीच झालेली नाही. तर करवंद येथेच बागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी २ लाख १३ हजार रूपयांचा खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात त्याठिकाणी बागच नाही. खोटी भिंत दाखवून पैसे लाटले आहेत. करवंद येथेच ३ लाख १८ हजाराचा सभामंडप दाखविण्यात आलेला आहे. मात्र तेथे सभामंडपच नाहीत. अशाप्रकारे जिल्ह्यात खोटी कामे दाखवून पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत १ कोटी ४ लाखाचा धनादेश तयार झालेला असून, या कामाची चौकशी झाल्याशिवाय धनादेश वितरीत करू नये अशी मागणी त्यांनी केली.
तिर्थक्षेत्र विकासमध्येही खोटी कामे
तीर्थक्षेत्र विकास योजनेतही शिंदखेडा तालुक्यात खोटी कामे दाखविण्यात आली आहे. त्यात ३० लाखांची बिले काढल्याचा त्यांनी आरोप केला. मालपूर येथे व्याघ्राबरी मंदिर, खलाणे येथे शिव मंदिर, वायपूर येथे दत्त मंदिर व बेटावद ेथे मंडबा मलाई मंदिरांना भेट दिली असता त्याठिकाणी जि.प. तीर्थक्षेत्र योजनेतून एकही डिलक्स बाक दिलेला नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
बीडीओंची तक्रार
शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली असता, सदस्यांचे काही ऐकणार नाही अशी उत्तरे दिली.गटविकास अधिकारी सहकार्य करीत नसल्याचाही आरोप सदस्यांनी केला.
रोहयोची कामे करा
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक ठिकाणी कंपन्या बंद आहेत. मजुरांना रोजगार नाही. त्यासाठी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली.
मात्र जिल्हाधिकारी कार्यलयातील दाणेज नावाचे अधिकारी रोहयोची कामे मंजूर करीत नसल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला.
सिंचन विहिरी देण्याचा अधिकार पंचायत समितीला असतांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी केली जाते. गुगल मॅपची कुठलीही तरतूद नसतांना या विहिरी गुगल मॅपवर शोधल्या जातात असा आरोपही करण्यात आला.
तसेच जि.प.सदस्य राम भदाणे यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी कधी मिळेल याची विचारणा केलीअसता, तो पुढील १५ दिवसात ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सभेत आरोग्य, शिक्षण, कृषी या विषयांवरही चर्चा झाली.

Web Title: Bills were issued in Dhule Zilla Parishad even though the work was not done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.