तीन एकर पपईच्या बागेवर फरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:01 IST2021-02-06T05:01:00+5:302021-02-06T05:01:00+5:30
सिंदगाव-लागवड खर्चही निघत नसल्याने उचलले पाऊल जेवळी : पपईच्या दरात मोठी घसरण झाल्याने लागवड खर्चही निघत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील ...

तीन एकर पपईच्या बागेवर फरविला नांगर
सिंदगाव-लागवड खर्चही निघत नसल्याने उचलले पाऊल
जेवळी : पपईच्या दरात मोठी घसरण झाल्याने लागवड खर्चही निघत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावरील पपईच्या बागेवर नांगर फिरविला.
सिंदगाव येथील शेतकरी चनाप्पा पाटील हे उच्च शिक्षित आहेत. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण अर्धवट साेडून शेतीकडे वळले. ते नेहमीच शेतीत नवनवीन प्रयाेग करतात. त्यांनी मार्च-एप्रिल महिन्यात सुमारे तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली. मुबलक पाणी आणि कुटुंबातील सर्वजण शेतात राबत असल्याने बागही बहरली. तीन एकरवरील क्षेत्रात चार हजार दोनशे झाडे होती. प्रत्येक झाडाला शंभरपेक्षा अधिक फळधारणा झाली होती. मार्च ते डिसेंबर या महिन्यात या बागेसाठी पाटील यांनी २ लाख ७० हजारांपेक्षा अधिक खर्च केला. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या तोडणीला त्यांना १५ रुपये दर मिळाला. होता तो फक्त तीन टनांसाठी. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पपईला मागणी नसल्याने दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे केवळ एक ते अडीच रुपये दर मिळाला. त्यामुळे काही वेळा नफा तर साेडा, तोडणीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संतापलेल्या या शेतकऱ्याने चक्क तीन एकर पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवून बाग मोडीत काढली.
काेट...
पपईच्या बागेच्या उत्पादनासाठी दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च झाला. पपई विक्रीतून मात्र १ लाख १० हजार रुपये मिळाले. त्यामुळे वर्षभराची मेहनत अन् लाखाेंचा फटका सहन करावा लागला. शेतीत नवनवीन प्रयाेग करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले. परंतु, नशिबाने साथ दिली नाही.
-चनप्पा पाटील, शेतकरी, सिंदगाव
कलिंगडातही नुकसानच
पपई पिकाबरोबर दीड एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली हाेती. एक लाख पाच हजार रुपये खर्च झाला. मात्र कलिंगड विक्रीतून केवळ ८५ हजार रुपये मिळाले. उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक झाले, परंतु दर मिळाला नाही. त्यामुळे ही शेतीही ताेट्यात गेली.
-चेतन पाटील, सिंदगाव