अभ्यासासाठी आता 'कोपरा' नको! धाराशिवच्या १७५ गावांत उभारणार सुसज्ज 'स्टडी हॉल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:34 IST2026-05-07T19:33:34+5:302026-05-07T19:34:40+5:30
"मुलींसाठी स्वतंत्र सोय अन् हाय-स्पीड इंटरनेट!" धाराशिवच्या वाडी-तांड्यांवरील मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न सुटणार.

अभ्यासासाठी आता 'कोपरा' नको! धाराशिवच्या १७५ गावांत उभारणार सुसज्ज 'स्टडी हॉल'
- बाबूराव चव्हाण
धाराशिव : ग्रामीण भागातील गुणवंत पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक मोठी अडचण आता कायमची दूर होणार आहे. लहान-लहान घरांमध्ये अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना घराचा एखादा कोपरा धरून किंवा कुटुंबाच्या गोंगाटात अभ्यास करावा लागतो. हीच समस्या मुळापासून उखडण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने कंबर कसली असून, जिल्ह्यातील १७५ मोठ्या गावांमध्ये १५ लाखांचा एकेक याप्रमाणे सुसज्ज 'स्टडी हॉल' उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेने या प्रकल्पासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या तिजोरीतून सुमारे २५ ते २६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या १२ मे रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर अधिकृतपणे अंतिम मोहोर उमटवली जाणार असून, त्यानंतर तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. हे स्टडी हॉल केवळ अभ्यासाची जागा नसून ते आधुनिक 'ज्ञानकेंद्र' म्हणून विकसित केले जातील. प्रत्येक हॉलमध्ये हाय-स्पीड इंटरनेट, अद्ययावत संगणक आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी महत्त्वाची पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. विशेष म्हणजे, मुलींच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार करून प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची सोय केली जाणार आहे. हे हॉल प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांच्या आवारात किंवा गावातील सोयीच्या ठिकाणी असतील. यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील मुले शिक्षणात मागे राहू नयेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
तालुकानिहाय असे आहे नियोजन
तालुका संख्या
तुळजापूर ४१
धाराशिव ४०
कळंब ३२
उमरगा २८
लोहारा ११
भूम १०
परंडा ०७
वाशी ०६
अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळेल
ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावर राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळत नाही. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत जागा ही अडचण ठरू नये, यासाठीच आम्ही हा निर्णय घेत आहाेत. १२ मे राेजी हाेणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय हाेईल. या स्टडी हॉलमुळे ग्रामीण भागातील गुणवत्ता नक्कीच उजळून निघेल.
-अर्चना पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, धाराशिव.