उस्मानाबाद - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दाेन दिवसांपूर्वीच राहुल गुप्ता यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला हाेता. यावेळी त्यांनी शिक्षक किती? शाळा किती? असे सरावलेले प्रश्न न विचारता, गुणवत्तेवर भर दिला. ‘झेडपी’चे विद्यार्थी ‘एमटीएस’मध्ये का उत्तीर्ण हाेत नाहीत, असा सवाल केला. यानंतर त्यांनी गुणवत्तावाढीसाठी ॲक्शन प्लॅन आखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने तज्ज्ञ गुरुजींची स्वतंत्र टीम तयार केली आहे. काम सुरू केले. दरम्यान, शुक्रवारी गुप्ता यांनी कळंब तालुक्यातील सातेफळ येथील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन क्लास घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता घसरतेय, असे प्रत्येकवेळी बाेलले जाते. बैठक संपली की, ताे विषय मागे पडताे. परंतु, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी पदाची सूत्रे हाती घेताच शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वर्गखाेल्या दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधकाम, शिक्षकांची संख्या, शिक्षकांचे प्रश्न अशा बाबींना फारसे महत्त्व न देता गुणवत्तेवर बाेला, असे अधिकाऱ्यांना सांगितले. आपल्याकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपली मुले ‘एमटीएस’मध्ये का येत नाहीत. आपण कमी पडताे. त्यात मुलांचा दाेष काय, असा सवाल करीत यापुढे गुणवत्तेशी तडजाेड खपून घेणार नाही, असे म्हटले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी ॲक्शन प्लॅन आखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागही ॲक्शन माेडवर गेला आहे. इतर गुरुजी, शाळांना नवनवीन प्रयाेगांच्या माध्यमातून मार्गदर्शन करू शकतील, अशा शिक्षकांचा एक गट तयार केला आहे. या गटाने आपले काम सुरूही केल्याचे शिक्षणाधिकारी माेहरे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगिले. दरम्यान, सीईओ गुप्ता यांनी शुक्रवारी कळंब तालुक्यातील सातेफळ येथील सहावी व सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन संवाद साधला. गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी फाडफाड उत्तरे दिली. यावेळी त्यांनी शिक्षक संजय धाेंगडे यांच्या कामाचे काैतुकही केले.