कळंब शहरात अनेक विकासकामे निधीअभावी प्रलंबित आहेत. शहरातील बहुतांश भागात तसेच वस्तीवाढ झाल्याने रस्ते, नाल्यांची कामे करणे ने आवश्यक आहे. काही रस्ते, नाल्या वापरायोग्य राहिल्या नाहीत. ही अवस्था शहरात सर्वच प्रभागात कमी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे अनेकदा नागरिक न. प. कडे तसेच त्यांच्या नगरसेवकांकडे रस्ते, नाल्यांची कामे करा म्हणून आग्रही असतात. परंतु, निधीअभावी ही कामे ठरावापुरतीच मर्यादित राहतात.
काही प्रभागात रस्ते, नाल्या होतात; पण त्यासाठी प्रशासनावर प्रभाव असणारे नगरसेवक आपले वजन खर्चून ती कामे मंजूर करून घेत असतात. नामधारी नगरसेवक असणाऱ्या प्रभागातील नागरिकांचा आवाज ना नगरसेवक ऐकतात ना नगरसेवकांचा आवाज प्रशासन ऐकते. येणारा तुटपुंजा निधी बाहुबली नगरसेवक खेचून नेतात व विकासाचा इतर भागातील अनुशेष कायम राहतो. शहरात निधीअभावी अशी अनेक कामे रखडलेली आहेत. मागील वर्षभरात कोविडमुळे शासनाने निधीसाठी हात आखडता घेतला तर न. प. च्या उत्पन्नालाही मर्यादा आल्या. एकूणच वाढत्या कळंबला वाढता निधी मिळत नसल्याने न. प. सत्ताधारी मंडळी व प्रशासन लोकवस्तीच्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करते आहे. मात्र मागणीच्या पाच ते दहा टक्केच निधी दिला जात असल्याने कामांना ब्रेक लागत आहे.
चौकट -
किमान १० कोटींची केली होती मागणी
शहरातील अगदीच खराब झालेले रस्ते, नाल्या यांची कामे हाती घेतली तरी किमान २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. न. प. ने पहिल्या टप्प्यात किमान १० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. परंतु, नगरविकास विभागाने २ कोटी दिल्याने केवळ एकाच भागातील कामे होणार आहेत. इतर भागातील कामे तसेच आठवडी बाजार रस्ता व नाली, महसूल कॉलनीतील रस्ते, राज्य मार्गावरून पुनर्वसन सावरगाव, बाबानगर, कल्पना नगर, शिवाजी नगर आदी भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कधी निधी मिळणार, याची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे.
कोट.......
न. प. ने स्वनिधीतून शहरात तब्बल साडेतीन कोटींची कामे हाती घेतली. ही महत्त्वाची कामे होऊ नयेत म्हणून ज्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तेच २ कोटींची कामे आणली म्हणून पत्रक काढत आहेत, ही आश्चर्याची बाब आहे. या कामांचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ द्या; त्याबाबत आम्ही त्यांना नावे ठेवणार नाहीत. शहरात विकासकामांचा मोठा बॅकलॉग आहे. तो भरून काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांची आवश्यकता होती. परंतु, २ कोटी मिळाले. आणखी निधी मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू.
- संजय मुंदडा, उपनगराध्यक्ष
कोट..........आ. पाटील यांच्याकडून २ कोटी
शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी कळंबच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून २ कोटी रुपयांचा निधी देऊन शहराच्या विकासकामामध्ये भर टाकल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा गटनेते शिवाजी कापसे यांनी म्हटले आहे. कळंब न. प. च्या सत्ताधारी मंडळीने जाणूनबुजून विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामे केली नाहीत. दत्त नगर या भागात निधी उपलब्ध करून न दिल्याने आ. कैलास पाटील यांनी या भागासाठी १ कोटी तर ढोकी रोड लगत असणाऱ्या मुख्य सिमेंट रस्त्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. दोन कोटी रुपयांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेतले जातील, असेही कापसे यांनी म्हटले आहे.