सफेद कार, ३ मृतदेह अन् मृत्यूचं गूढ! राजधानी दिल्लीत खळबळ; १८ तासानंतर प्रकरणाचा गुंता सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:23 IST2026-02-09T12:22:48+5:302026-02-09T12:23:20+5:30
उड्डाणपुलाजवळ उभ्या असणाऱ्या त्या सफेद कारमधील चित्र खूप भयानक होते. दुपारच्या वेळी जेव्हा लोकांनी जेव्हा कारमधील तिघांची कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहिले त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

सफेद कार, ३ मृतदेह अन् मृत्यूचं गूढ! राजधानी दिल्लीत खळबळ; १८ तासानंतर प्रकरणाचा गुंता सुटेना
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या पीरागडी उड्डाणपुलाजवळ उभ्या असलेल्या एका कारमद्ये ३ मृतदेह सापडले. या घटनेला १८ तास उलटले आहेत परंतु अद्याप यामागची पूर्ण कहाणी समोर आली नाही. हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होत चालले आहे. सुरुवातीच्या तपासात पोलीस या प्रकरणाकडे आत्महत्येच्या नजरेने पाहत आहेत परंतु दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या तिघांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे.
दिल्ली पोलिसांना रविवारी दुपारी ३.५० वाजता पीरागडी उड्डाणपुलाजवळील घटनेबाबत एक कॉल आला. घटनास्थळी पोहचलेल्या टीमला एका कारमध्ये २ पुरुष आणि एक महिला मृतावस्थेत आढळली. या मृतकांमध्ये ७६ वर्षीय रणधीर, ४० वर्षीय शिव नरेश आणि ४० वर्षीय लक्ष्मी यांचा समावेश आहे. रणधीर या कारचे मालक होते आणि शिव नरेश त्यांच्याकडे प्रॉपर्टीचे काम करत होता. पोलिसांना या तिघांच्या मृतदेहावर कुठल्याही खुणा सापडल्या नाहीत. त्यामुळे प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत आहे. परंतु शिव नरेश याचा भाऊ राम नरेश याने या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस सध्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत त्यातून मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
सफेद कार अन् तिघांचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य
उड्डाणपुलाजवळ उभ्या असणाऱ्या त्या सफेद कारमधील चित्र खूप भयानक होते. दुपारच्या वेळी जेव्हा लोकांनी जेव्हा कारमधील तिघांची कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहिले त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या कारच्या आत रणधीर, शिव नरेश आणि लक्ष्मी देवी यांचा मृतदेह सापडला. या घटनेला आता १८ तास होऊन गेलेत परंतु कुठलाही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही.
फोन करून बोलावले, मग केली हत्या
या घटनेतील मृत शिव नरेशचा भाऊ राम नरेशने गंभीर दावा केला आहे. तो म्हणाला की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. माझ्या भावाला फोन करून बोलवण्यात आले होते. त्याचा हेल्मेट कारमध्येच सापडला आहे. प्रॉपर्टीच्या कामाशी निगडीत असल्याने कुठल्यातरी षडयंत्रातून त्याला संपवण्यात आल्याचा संशय त्याने व्यक्त केला. परंतु पोलीस तपासानुसार मृतदेहांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत, काही संशयास्पद आढळले नाही त्यामुळे ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला आहे. परंतु कारमधील तिघांच्या मृत्यूने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. एखादा विषारी पदार्थ त्यांना खायला दिला नाही ना असाही संशय व्यक्त होतोय परंतु पोस्टमोर्टम रिपोर्टनंतरच त्याचे उत्तर मिळू शकेल.
संपत्तीचा वाद की अन्य काही कारण?
मृत शिव नरेश त्याचा मालक रणधीर यांच्याकडे प्रॉपर्टीचे काम सांभाळत होता. कारमध्ये रणधीर यांचाही मृतदेह आहे. मालक आणि कर्मचारी यांच्यासोबत एका महिलेचा मृतदेह सापडल्याने प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. आता पोलीस या तिघांचे एकमेकांशी काय कनेक्शन होते, मृत्यूच्या काही तासांआधी त्यांच्या हालचाली शोधल्या जात आहेत. ज्यातून ते तिघे इथे कसे पोहचले जिथे त्यांचा मृतदेह सापडला याचाही पोलीस शोध घेत आहेत.