अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:48 IST2026-05-12T11:47:36+5:302026-05-12T11:48:46+5:30
मुलाला आणि मुलीला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडले, त्यानंतर कायद्याची भीती न बाळगता तालिबानी पद्धतीने शिक्षा देण्यात आली.

AI Generated Image
माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातून समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडले, त्यानंतर कायद्याची भीती न बाळगता तालिबानी पद्धतीने शिक्षा देण्यात आली. या दोघांची केवळ धिंडच काढली नाही, तर भरचौकात मुलाचे अर्धे डोके भादरून त्यांचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पोलिसांनी आता वेगाने सूत्रे हलवली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कटिहारमधील कुर्सेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबराही दियारा भागात घडली. गंगा नदीच्या पलीकडे असलेल्या या दुर्गम भागात एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी सोबत होते. गावकऱ्यांनी त्यांना पाहिले आणि संशयावरून त्यांना पकडले. त्यानंतर जमावाने स्वतःच न्यायाधीश बनून शिक्षा सुनावली.
मुलाचे अर्धे केस कापून त्याला विद्रुप करण्यात आले. त्याला संपूर्ण गावातून फिरवून अपमानित करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, जमावाने दोन्ही अल्पवयीन मुलांचे विधी उरकून जबरदस्तीने लग्न लावून दिले. उपस्थित गर्दीतील काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता व्हायरल होत आहे.
पोलिसांची कारवाई आणि संताप
व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. कोढा पोलीस उपविभागाचे डीएसपी रंजन सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे मुख्य आरोपीला, जो मुलीचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे, अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.
स्थानिक पंचायत प्रमुख ललन राम यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. "कोणालाही अशा प्रकारे कायदा हातात घेऊन एखाद्या अल्पवयीन मुलाचा छळ करण्याचा अधिकार नाही. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अमानवीय आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.