२६ जानेवारीपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळला; २.५ किलो RDX सह ४ दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:23 IST2026-01-24T11:23:39+5:302026-01-24T11:23:50+5:30
प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी एक मोठा दहशतवादी कट उधळला आहे.

२६ जानेवारीपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळला; २.५ किलो RDX सह ४ दहशतवाद्यांना अटक
प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी एक मोठा दहशतवादी कट उधळला आहे. होशियारपूरमध्ये पोलिसांनी पाकिस्तानच्या 'आयएसआय' (ISI) समर्थित प्रतिबंधित संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २.५ किलो आरडीएक्सने भरलेले आयईडी (IED) जप्त करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची दिलजोत सिंह, हरमन सिंह उर्फ हॅरी, अजय उर्फ माहिरा आणि अर्शदीप सिंह उर्फ अर्श कंडोला अशी नावं आहेत. हे सर्वजण एसबीएस नगर जिल्ह्यातील राहों भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून स्फोटकांव्यतिरिक्त दोन पिस्तूलही जप्त केली आहेत.
प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा होता कट
डीजीपी गौरव यादव यांच्या माहितीनुसार, हे मॉड्यूल अमेरिकेत बसलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या हँडलर्सद्वारे चालवलं जात होतं. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना लक्ष करून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी या आयईडीचा वापर केला जाणार होता.
अमेरिकेतून मिळत होते निर्देश
बीकेआयचे हँडलर अमेरिकेत बसून या दहशतवाद्यांना सूचना देत होते, तर पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' त्यांना स्फोटके पुरवत होती. पंजाबमधील शांतता भंग करणं आणि 'टार्गेटेड किलिंग' करण्यासाठी ही टोळी तयार करण्यात आली होती. पोलीस सध्या या चारही दहशतवाद्यांची कसून चौकशी करत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. होशियारपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) संदीप मलिक यांनी सांगितलं की, गुप्तचर माहितीच्या आधारे होशियारपूर पोलीस आणि सीआय जालंधरच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.