रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी; ७५ वर्षीय वृद्धेला धक्के मारत साडी खेचली, धक्के मारले; घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:12 IST2026-05-13T16:07:56+5:302026-05-13T16:12:23+5:30
भारतीय रेल्वेत एका वृद्ध महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी; ७५ वर्षीय वृद्धेला धक्के मारत साडी खेचली, धक्के मारले; घटना कॅमेऱ्यात कैद
Railway Staff Misbehaviour Video: भारतीय रेल्वेतून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय वृद्ध महिला विक्रेतीला रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्यंत अमानवीय वागणूक दिल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
रिया घोष नावाच्या एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक वृद्ध महिला रेल्वे डब्यात बसली आहे. ती हात जोडून रेल्वे कर्मचाऱ्यांसमोर विनवणी करत असतानाही कर्मचाऱ्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वादादरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी या वृद्धेला धक्के मारले तसेच एका क्षणी तिची साडीही खेचल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. ही महिला रेल्वेत काही वस्तू विकून आपली उपजीविका करत होती. मात्र, हा वाद नेमक्या कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
प्रवाशांची मुकसंमती आणि संताप
ही घटना घडली तेव्हा रेल्वे डब्यात अनेक प्रवासी उपस्थित होते, मात्र कोणीही त्या वृद्धेला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. रिया घोष यांनी म्हटले की, "७५ वर्षांच्या वृद्ध महिलेचा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अपमान केला गेला आणि लोक प्रेक्षक बनून पाहत राहिले. जेव्हा भीती ही धैर्यावर विजय मिळवते, तेव्हा माणुसकीचा अंत होतो."
सोशल मीडियावर तीव्र पडसाद
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त केला आहे. सुसंस्कृत समाजात अशा खालच्या दर्जाच्या कृत्यांना जागा नाही. या कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. दुसऱ्या एका युजरने भारतीय रेल्वेच्या सुरक्षेवर आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रेल्वे सेवाकडून दखल
वाढता वाद पाहता रेल्वेने या प्रकरणाची दखल घेतली आहे. रेल्वे सेवेच्या अधिकृत हँडलवरून या पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, "आम्हाला ही घटना पाहून काळजी वाटत आहे आणि आम्ही त्वरित मदत करू इच्छितो. कृपया प्रवासाचा तपशील शेअर करा."
ही घटना नेमकी कोणत्या ट्रेनमध्ये आणि कधी घडली, याचा तपास रेल्वे प्रशासन करत आहे. तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.