लाडक्या सुनेला सोन्याचे दागिने भेट देण्याची हौस प्रत्येक सासूला असते. पण गुजरातच्या सुरतमध्ये या हौसेपोटी एका सासूने जे काही केले, ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. आपल्या मुलाच्या 'लव्ह मॅरेज'नंतर सुनेला सोन्याचे दागिने गिफ्ट करण्यासाठी एका महिलेने चक्क स्वतःच्या घरमालकाच्याच घरात डल्ला मारला. या सासूबाईंनी घरमालकाच्या कपाटातून तब्बल १७.७७ लाख रुपये किमतीचे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी घरमालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सासूला अटक केली असून तिच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त केले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
ही धक्कादायक घटना सुरत परिसरात घडली आहे. येथील एका नामांकित खाजगी शाळेत शिक्षिका असलेल्या ४२ वर्षीय शिल्पाबेन पदमाणी यांच्या घरात ही चोरी झाली होती. घटना घडली त्या दिवशी शिल्पाबेन यांचा मुलगा ट्यूशनला जाण्यासाठी निघाला, मात्र घाईघाईत तो घराच्या मुख्य खोलीला कुलूप लावायला विसरला. घराला कुलूप नसल्याची संधी पहिल्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या आरोपी महिलेने साधली. तिने घरात घुसून कपाटातील तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आणि गुपचूप आपल्या खोलीत निघून गेली.
पोलीस चौकशीत सासूने दिली कबुली
घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर दागिने चोरीला गेल्याचे समजताच शिक्षिका शिल्पाबेन यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, घरात बाहेरील व्यक्तीने जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही चिन्ह दिसले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय घरातीलच किंवा आजूबाजूच्या ओळखीच्या व्यक्तीवर गेला. पोलिसांनी संशयावरून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू महिलेला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलाने नुकताच प्रेमविवाह केला होता. तिला आपल्या नवीन सुनेला सोन्याचे दागिने भेट म्हणून द्यायचे होते, पण घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिने घरमालकाच्या घराचा गैरफायदा घेत ही चोरी केली.
आधी पोलिसांना फसवले, नंतर..
गुन्हा कबूल केल्यानंतरही आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने पोलिसांना सांगितले की, तिने हे दागिने अवघ्या ३.३६ लाख रुपयांना विकले आणि त्यातील २ लाख रुपये रस्त्यात कुठेतरी पडून हरवले. मात्र, पोलिसांना तिच्या या कहाणीवर संशय आला. पोलिसांनी तिच्या घराची कसून झडती घेतली असता, गॅलरीच्या छज्जावर लपवून ठेवलेल्या एका प्लास्टिकच्या डब्यातून सर्वच्या सर्व १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सुनेच्या कोडकौतुकासाठी चक्क चोर बनलेल्या या सासूबाईंची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
Web Summary : In Surat, a mother-in-law stole ₹17.77 lakh worth of gold jewelry from her landlord to gift her daughter-in-law after her love marriage. Police arrested her and recovered the stolen items hidden in her home.
Web Summary : सूरत में, एक सास ने अपनी बहू को उपहार देने के लिए मकान मालकिन से ₹17.77 लाख के सोने के गहने चुरा लिए। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया और उसके घर में छुपाई गई चोरी की वस्तुएं बरामद कर लीं।