मुंबई : वादग्रस्त सहायक पालिका आयुक्त महेश पाटील तसेच त्याच्या साथीदारांच्या मालमत्ता गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाटीलने अभिनेता जावेद जाफरी यांची पत्नी हबिबा यांना आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवून कार्यालयात बोलावले. पुढे, अधिकारी पदाचा विश्वास निर्माण करत जाळ्यात ओढले. त्यांनीही विश्वास ठेवून गुंतवणूक केली. मात्र, गेल्यावर्षी रजिस्ट्रेशन ऑफीसमध्ये पाटील, व्यावसायिक निशित पटेल यांनी केलेले करारनामे बनावट असल्याचे समजताच आरोपीचे बिंग फुटल्याचे पोलिसांना सांगितले.
तक्रारदार हबिबा यांनी दिलेल्या जबाबानुसार, एप्रिल २०२४मध्ये अंधेरी येथील त्यांच्या मालमत्तेबाबत पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स नोटीस आली होती. त्यानंतर परिचित अली रझा यांच्या माध्यमातून पाटीलशी ओळख झाली. लोअर परळ येथील बीएमसी कार्यालयातील भेटीत पाटीलने प्रॉपर्टी टॅक्स प्रकरण सोडवून देण्याबरोबरच वांद्रे पश्चिम येथील “न्यू कमलकुंज” या कमर्शियल प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला. हा प्रोजेक्ट भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरणार असून, प्रति चौ. फूट १,५०० रुपये भाडे मिळेल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा केला.
“विशेष माहिती” असल्याचे सांगितले
स्वतः बीएमसी अधिकारी असल्याने त्यांच्याकडे “विशेष माहिती” असल्याचे सांगत, पाटीलने पटेलशी ओळख करून दिली. पटेलचे मोठ्या बिल्डर्सशी संबंध असल्याचेही सांगण्यात आले. पुढे, पाटील यांनी जाफरी यांच्या घरी पत्नी व मुलासह भेट देऊन कुटुंबाचा विश्वास जिंकला. त्यांनी सुप्रीम बिल्डर्स, अजमेरा बिल्डर्स, तसेच बार्कलेज बँकेसोबत प्री-लीज करार होणार असल्याचे सांगत गुंतवणुकीसाठी दबाव टाकला. त्यांनी तसेच त्याच्या कुटुंबीयांनी जवळपास १८ कोटीपर्यंत गुंतवणूक केली.
बनावट प्रोजेक्टचे नकाशे, पत्रे आणि करारनामे
८ मे २०२४ रोजी निशित पटेल हा आणखी एका व्यक्तीसह जाफरी यांच्या घरी आला. त्याने ‘न्यू कमलकुंज’ प्रोजेक्टचे नकाशे दाखवत ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. बदल्यात २० हजार चौ.फूट कमर्शियल स्पेस मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बार्कलेज बँकेचे स्वारस्यपत्र, सुप्रीम युनिव्हर्सल आणि अजमेरा बिल्डर्सच्या लेटरहेडवरील दस्तऐवज दाखवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भाडे उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
पोस्ट डेटेड चेक झाले बाउन्स
११ जुलै २०२५ रोजी हबिबा या खार येथील नोंदणी कार्यालयात गेल्या असता संबंधित दस्तऐवज अस्तित्त्वात नसल्याचे समजले. त्यानंतर पटेलला जाब विचारल्यावर त्याने कागदपत्र बनावट असल्याची कबुली दिली. पुढे, जाफरी कुटुंबाने सुप्रीम बिल्डर्सच्या कार्यालयात चौकशी केली असता, संबंधित बिल्डर्सनी पाटील, पटेल यांना ओळखत नसल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला.
कमलकुंज प्रोजेक्टशी संबंध नसल्याचेही स्पष्ट केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीकडे पैसे परत देण्याची मागणी केली. काही वेळा पोस्ट डेटेड चेक दिले. मात्र, ते बाउन्स झाले. गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत संपूर्ण रक्कम व्याजासह परत करू, असे सांगूनही आरोपींनी पैसे परत केले नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
महेश पाटीलने त्याच्या निवृत्त पोलिस अधिकारी वडिलांनीही गुंतवणूक केल्याचे म्हणत विश्वास संपादन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, जावेद जाफरी, हबिबा जाफरी, नावेद जाफरी, उस्मान खान, लॉन्जी फर्नांडिस, शबाना फर्नांडिस आदींनी विविध कंपन्यांच्या खात्यांत कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले.
‘पूजन टेक्नॉलॉजिस’, ‘उदित ट्रेडर्स’, ‘अशियान फूड’, ‘आरपीपीएल मल्टी ट्रेड प्रा. लि.‘ अशा विविध कंपन्यांच्या नावाने पैसे स्वीकारण्यात आले. एकूण व्यवहारांमध्ये सुमारे १५.९२ कोटी रुपये बँक व्यवहारातून दिल्याचा दावा आहे. याशिवाय ४९ लाख रुपये रोख, त्यांच्या मुलाचे २० लाखांचे रोलेक्स घड्याळ आणि परकीय चलनही आरोपींना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Web Summary : BMC official Mahesh Patil allegedly defrauded Javed Jaffrey's wife Habiba, promising lucrative returns on a fake commercial project after initially sending her a property tax notice. She invested crores, only to discover forged documents.
Web Summary : बीएमसी अधिकारी महेश पाटिल पर जावेद जाफरी की पत्नी हबीबा को संपत्ति कर नोटिस भेजकर जाली वाणिज्यिक परियोजना में आकर्षक रिटर्न का वादा करके धोखा देने का आरोप है। करोड़ों का निवेश करने के बाद जाली दस्तावेज सामने आए।