पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता ममता बॅनर्जी पुन्हा एकदा आपल्या पक्षासाठी कामाला लागल्या आहेत. अनेक वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा धक्का सहन करत तृणमूल काँग्रेस आता थेट सत्तेतून बाहेर पडली आहे. याच दरम्यान कोलकाता येथील कालीघाट इथल्या आपल्या निवासस्थानी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवलेल्या पक्षाच्या उमेदवारांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
अभिषेक बॅनर्जी देखील या बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीतील पराभवानंतर संघटनेत एकजुटीचा संदेश देणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, तृणमूल काँग्रेस संघर्ष पाहून मागे हटणार नाही.
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या"
ममता बॅनर्जी यांनी नेत्यांच्या पक्षांतरावर उघडपणे भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "ज्या नेत्यांना दुसऱ्या पक्षात जायचं आहे, त्यांना जाण्याचं स्वातंत्र्य आहेत. जे लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत, त्यांना जाऊ द्या. मी पक्ष नव्याने उभा करेन. जे लोक माझ्यासोबत राहतील, त्यांना मी सांगू इच्छिते की, त्यांनी नुकसान झालेली पक्ष कार्यालयं पुन्हा सुरू करावीत, त्यांना रंग द्यावा आणि काम सुरू करावं. गरज पडल्यास मी स्वतः त्या कार्यालयांचं रंगकाम करेन. तृणमूल काँग्रेस कधीच झुकणार नाही."
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ही पहिलीच मोठी आढावा बैठक असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांनी नेत्यांना निराश न होण्याचं आणि संघटना तळागाळात पुन्हा मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं.
"आम्ही कधीही झुकणार नाही"
या बैठकीनंतर टीएमसीच्या अधिकृत 'एक्स' (X) हँडलवर काही फोटो शेअर करण्यात आले. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "उमेदवारांनी कल्पनेपलीकडचे अत्याचार आणि सततच्या धमक्यांना न जुमानता धैर्याने निवडणूक लढवली." पक्षाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, "तृणमूल काँग्रेस एका कुटुंबासारखी एकजुटीने उभी आहे. ज्यांनी जनतेचा कौल चोरला आहे, त्यांच्यासमोर आम्ही कधीही झुकणार नाही. शेवटी विजय सत्याचाच होईल."
केवळ ८० जागांवर विजय
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यातील एकूण २९४ जागांपैकी पक्षाला केवळ ८० जागांवर विजय मिळवता आला. टीएमसीने २९१ जागांवर उमेदवार उभे केले होते, तर ३ जागा सहयोगी पक्ष बीजीपीएम (BGPM) ला दिल्या होत्या. सर्वात मोठा धक्का म्हणजे, निवडणूक लढवलेल्या २९१ उमेदवारांपैकी २११ उमेदवारांचा पराभव झाला. सर्वात जास्त चर्चा स्वतः ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची होत आहे.
Web Summary : Following a setback in West Bengal, Mamata Banerjee rallied TMC candidates, urging unity. She declared that defectors are free to leave, vowing to rebuild the party and resist defeat, emphasizing perseverance and grassroots strengthening after securing only 80 seats.
Web Summary : पश्चिम बंगाल में हार के बाद, ममता बनर्जी ने टीएमसी उम्मीदवारों को एकजुट किया। उन्होंने कहा कि दल-बदल करने वाले जा सकते हैं, वह पार्टी का पुनर्निर्माण करेंगी और हार का विरोध करेंगी, 80 सीटें हासिल करने के बाद दृढ़ता और जमीनी स्तर पर मजबूती पर जोर दिया।