कौटुंबिक वादातून सासूने केली सुनेची हत्या, स्वत:च पोलीस ठाण्यात झाली हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 07:49 PM2019-12-15T19:49:12+5:302019-12-15T19:49:36+5:30

आरोपी सासू विरोधात पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

Mother-in-law murdered her Daughter-in-law in Vasai | कौटुंबिक वादातून सासूने केली सुनेची हत्या, स्वत:च पोलीस ठाण्यात झाली हजर

कौटुंबिक वादातून सासूने केली सुनेची हत्या, स्वत:च पोलीस ठाण्यात झाली हजर

Next

- आशिष राणे 
वसई  - आपल्या पोटच्या मुलाला लग्न झाल्यावर सुनेने परदेशात नेल्याच्या रागातून व अन्य कौटुंबिक वाद- विवादातून सासूने रागाच्या भरात आपल्या 32 वर्षीय सुनेच्या डोक्यात फुलदाणीचा जोरदार प्रहार करीत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईच्या ओंमनगर परिसरातील एका गृहसंकुलात रविवार (दि.15 ) सकाळी घडली आहे.

या प्रकरणी घटना घडल्यावर स्वतःहून आरोपी सासू आनंदी माने या गृहिणी महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात हजेरी लावून घडला प्रकार पोलिसाना कथन केल्यावर आरोपी सासूला अटक केली असल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली. या प्रकरणी अधिक माहिती घेतल्यावर आरोपी सासू आनंदी माने हिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती देतांना पो.नि.कांबळे यांनी सांगितले की, सासू आनंदी माने आणि मयत रिया माने वय 32 या दोघीमध्ये कौटुंबिक वाद होता.सासू आनंदी यांना आपली सून रिया विषयी मनात अनेक गोष्टी बाबत असूया होती. इतकच नाही तर लग्न झाल्यावर सुनेने तिच्या मुलाला परदेशात घेऊन गेल्यामुळे हा वाद अधिकच वाढला होता.

दरम्यान नुकतेच पंधरा दिवसापूर्वी मयत रिया व तिचा पती व सहा महिन्यांची मुलगी अमेरिकेहून वसईच्या ओंमनगर येथील घरी परतले होते, मात्र इथे आल्यावर हि सासू व सुने मध्ये भांडणाचे खटके उडायचे, मात्र रविवार हा सुनेसाठी शेवटचा दिवस ठरला अगदी सकाळच्या 9 च्या सुमारास सासू आनंदी आणि सून रिया यांच्यात पुन्हा वाद झाला आणि सासूने रागाच्या भरात फुलदाणीच्या सहाय्याने सुनेच्या डोक्यात जबर फटका मारला असता सून तात्काळ जमिनीवर खाली पडली, रक्तबंबाळ सुन गंभीर जखमी झाल्याचे समजताच सासूने थेट माणिकपूर पोलीस स्टेशन गाठले व घडला प्रकार पोलिसांना कथन केल्यावर पोलीस निरीक्षक कांबळे यांनी सासूच्या सांगण्यावरून दोन पोलीस घटनास्थळी पाठवले असता तिथे सून रिया हि रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती मात्र अधिक चौकशीत ती मृत आढळून आली.

अखेर पोलीस निरीक्षक कांबळे यांनी लागलीच घटनास्थळाचा पंचनामा करून रियाचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनसाठी पाठवला. तो पर्यंत इथे सासूला ताब्यात घेऊन तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली एकंदरीतच सासूने आपल्या सुनेला का बार मारले याचे प्राथमिक तपासातले कारण जरी कौटुंबिक वाद विवाद असला तरी नेमकें कारण अधिक पोलीस तपासातच  समोर येईल, मात्र आपल्या पोटच्या मुलाला आईपासून दूर केले, तर आपल्याला नातवंडे खेळवायला मिळाली नाही असे शल्य बाळगत आणि अशा नाजूक कौटुंबिक कारणांच्या त्रागामुळे डोक्यात राग घेतून हि हत्या  झाली असल्याचे  काहीसे म्हणावे लागेल.

घडल्या घटनेने मात्र वसईतील ओमनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एकंदरीतच हि घटना म्हणजे सासू सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना म्हणावी लागेल.                

सदर सुनेची सासूकडून झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, सासू आनंदी मानेवर हत्येचं गुन्हा दाखल करून अटक  केली आहे. प्राथमिक तपासात सासू सुनेचा वाद होता वाद विकोपाला गेला आणि ही घटना घडली ,घटना दुर्देवी आहे मात्र सदरचे कुटुंब उत्तम राहणीमान व प्रतिष्ठित असतांना ही घटना घडणे हे सयुक्तिक नाही,त्यामुळे या प्रकरणांबाबत अधिक तपास केला जाईल. त्यामुळे या घटनेचे नेमकं कारण कळू शकेल.
 - पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे
माणिकपूर पोलीस स्टेशन ,वसई      

Web Title: Mother-in-law murdered her Daughter-in-law in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.