चोरांचा कारनामा! ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी, पैसे... कुटुंब लग्नाला अन् घरातील ५० लाखांवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:51 IST2026-03-12T11:50:11+5:302026-03-12T11:51:08+5:30
एका सराफा व्यापाऱ्याचं घर आणि दुकान चोरांनी अशा वेळी टार्गेट केलं, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बाहेर गेलं होतं.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका सराफा व्यापाऱ्याचं घर आणि दुकान चोरांनी अशा वेळी टार्गेट केलं, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बाहेर गेलं होतं. घर बंद असल्याचं पाहून चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे ५० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. एरच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसकिल बुजुर्ग गावात ही घटना घडली आहे.
चोरीची ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस आता या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. सराफा व्यापारी जितेंद्र सोनी हे आपल्या घरातूनच दागिन्यांचं दुकान चालवतात. त्यांच्या मुलीचं लग्न मध्य प्रदेशातील छतरपूर येथे होतं. ९ मार्च रोजी हा विवाह सोहळा पार पडणार होता. याच कारणास्तव ९ मार्च रोजी सकाळी १० च्या सुमारास संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून छतरपूरला रवाना झालं. घर आणि दुकान दोन्ही बंद होतं.
शेजाऱ्यांनी दिली चोरीची माहिती
कुटुंब गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी घराच्या मुख्य गेटची कडी तुटलेली पाहिली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ फोन करून कुटुंबाला याची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंब गावी परतलं. जेव्हा त्यांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. खोल्यांचं कुलूप तुटलेलं होतं, कपाटं उघडी होती आणि सर्व सामान विखुरलं होतं. तसेच दुकानाचं कुलूपही तुटलेलं आढळलं आणि तिथून मौल्यवान दागिने गायब होते.
५० लाखांचे दागिने आणि रोख गायब
मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी घर आणि दुकान दोन्ही पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. दुकानातून ५२ ग्रॅम सोनं, २ किलो चांदी आणि ३५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. तर घराच्या आतून व्यापाऱ्याच्या आईचे सुमारे २७३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी पळवून नेली. अशा प्रकारे एकूण ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी आणि पैसे असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना
जेव्हा कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा त्यात संशयास्पद हालचाली दिसल्या. फुटेजमध्ये असं दिसून आलं की, ९ मार्चला जेव्हा कुटुंब लग्नासाठी निघत होतं, त्याच वेळी दोन बाईकरून आलेले तीन तरुण घराच्या आसपास फिरत होते. बराच वेळ ते तिथे थांबले आणि नंतर निघून गेले. याच वेळी चोरांनी घराची 'रेकी' केल्याचा संशय आहे. त्यानंतर रात्री २ च्या सुमारास चोर परत आले आणि त्यांनी चोरी केली. चोरी दरम्यान चोरांनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. घरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी तोडून टाकले.