आजच्या काळात मोबाईल हे संवादाचे साधन कमी आणि वादाचे कारण जास्त ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बदनावर (ग्राम कारोदा) येथे एका पतीने आपल्या पत्नीची केवळ या कारणास्तव हत्या केली की, ती फोनवर खूप जास्त वेळ बोलायची. या नराधमाने केवळ हत्याच केली नाही, तर हत्येनंतर पोलिसांनी दिशाभूल करण्यासाठी पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची अफवा देखील पसरवली. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टने या क्रूर पतीचे पितळ उघडे पाडले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय कृष्णा आणि २८ वर्षीय राणी यांच्यात शुक्रवारी रात्री फोनवर बोलण्यावरून जोरदार वाद झाला होता. राणी सतत मोबाईलवर व्यस्त असते, ही गोष्ट कृष्णाला खटकत होती. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागातच कृष्णा घराबाहेर पडला. बाहेरून दारू पिऊन आल्यावर त्याने एक भयानक कट रचला.
साडीने आवळला गळा अन् रात्रभर बाहेर झोपला...
कृष्णा जेव्हा घरी परतला तेव्हा राणी गाढ झोपेत होती. रागाने पिसाळलेल्या कृष्णाने झोपलेल्या राणीच्या पाठीवर बसून तिच्याच साडीने गळा आवळला. राणीचा श्वास थांबेपर्यंत त्याने फास ओढला. राणीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर हा क्रूर पती घराबाहेर आला आणि चक्क खाटेवर झोपला, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये.
असा उघड झाला बनाव
दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णाने रडण्याचा बनाव केला आणि राणीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मृतदेहाचे निरीक्षण करताना पोलिसांना राणीच्या गळ्यावर फासाचे वळ दिसले. विष प्राशन केल्याच्या दाव्याशी हे वळ जुळत नव्हते. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण गळा आवळणे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलला!
संशय बळावल्याने पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. फोनच्या नादामुळे आपल्या पत्नीची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : In Madhya Pradesh, a man murdered his wife for excessive phone use. He strangled her, staged a suicide, but the autopsy revealed the truth. Police arrested him after he confessed.
Web Summary : मध्य प्रदेश में एक व्यक्ति ने फोन के ज़्यादा इस्तेमाल के कारण पत्नी की हत्या कर दी। उसने गला घोंटकर आत्महत्या का नाटक किया, लेकिन पोस्टमार्टम से सच सामने आ गया। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया।