आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला होता. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबईच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकत दमदार सुरुवात केली होती. मात्र सामन्यागणिक मुंबई इंडियन्सचा फॉर्म घसरत गेला. तसेच अखेरीस याची परिणती मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्यात झाली. एकापेक्षा एक तगडे खेळाडू, मोठा सपोर्ट स्टाफ सारं काही असूनही मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेत अपयशी कसा काय ठरला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईचे जवळपास सर्वच दिग्गज खेळाडू अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह संपूर्ण हंगामात अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. कर्णधार हार्दिक पांड्या कर्णधारपद आणि वैयक्तिक कामगिरी अशा दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला. तिलक वर्मा, नमन धीर, रायन रिकल्टन, विल जॅक्स अधूनमधून चमकले.
पण मुंबई इंडियन्ससाठी खेळाडूंचा खराब फॉर्म नव्हे तर संघाचं एकसंध न होणं आणि योग्यवेळी सांघिक कामगिरी न उंचावणं हे अपयशाचं सर्वात मोठं कारण ठरलं. अनेक सामन्यांत फलंदाजांनी निराशा केली. तर काही सामन्यात गोलंदाजी ढेपाळली. गोलंदाजीमध्ये अखेरच्या षटकात धावा रोखण्यात अपयश आलं. तर काही सामन्यात चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत परीवर्तित करण्यात गोलंदाज अयशस्वी ठरले. त्यामुळे सांघिक कामगिरी न उंचावणे हे मुंबईसाठी यंदाच्या हंगामात आलेल्या अपयशाचे सर्वात मोठे कारण ठरले.
दरम्यान, बंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना वरिष्ठ खेळाडूंना आलेल्या अपयशाबाबत विचारले असता त्यांनी यासाठी संघातील कुठल्याही अंतर्गत कुरबुरी कारणीभूत नसल्याचे सांगितले. संघातील खेळाडू मेहनत घेत होते. नेट्समध्ये घाम गाळत होते. मात्र संघाची सांघिक कामगिरी चांगली झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
आणखी एक बाब म्हणजे आयपीएलच्या गेल्या सहा हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सला एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. मुंबईने २०२० मध्ये शेवटचं आयपीएलचं विजेतेपद जिंकलं होतं. मात्र नंतर प्रत्येक वेळी मुंबई इंडियन्सकडे संभाव्य विजेता म्हणून पाहण्यात आले. मात्र मुंबईला विजेतेपद काही मिळवता आले नाही.
Web Summary : Mumbai Indians exited IPL despite star players. Key players underperformed, and the team failed to unite. Inconsistent batting and bowling, especially in crucial moments, led to their downfall. Coaches cite lack of cohesion, not internal issues, as the main reason for the disappointing season.
Web Summary : मुंबई इंडियंस स्टार खिलाड़ियों के बावजूद आईपीएल से बाहर हो गई। प्रमुख खिलाड़ी उम्मीदों पर खरे नहीं उतरे और टीम एकजुट होने में विफल रही। बल्लेबाजी और गेंदबाजी में असंगतता, खासकर महत्वपूर्ण क्षणों में, उनके पतन का कारण बनी। कोचों ने निराशाजनक सीजन का मुख्य कारण आंतरिक मुद्दों को नहीं, बल्कि सामंजस्य की कमी को बताया।