हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:25 IST2025-11-28T18:22:14+5:302025-11-28T18:25:58+5:30
लग्नाच्या दोनच दिवसांनंतर नवरदेवाचा बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. साता जन्माची साथ अवघ्या दोन दिवसांत सुटली.

हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या दोनच दिवसांनंतर नवरदेवाचा बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. साता जन्माची साथ अवघ्या दोन दिवसांत सुटली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नवरीसह नवरदेवाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.
३० वर्षीय आदित्य जाटव हा मसुरी येथील डीआरडीओमध्ये जॉईंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या लग्नासाठी अलवरला येण्यासाठी सुट्टी घेतली होती. आदित्यने २५ नोव्हेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल श्याम सिंह यांची मुलगी निव्याशी लग्न केलं. दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक ही धक्कादायक घटना घडली.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य सकाळी ५:३० च्या सुमारास बाथरूममध्ये गेला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने त्यांनी दार वाजवलं. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये आदित्य बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला ताबडतोब जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आदित्यचा अचानक मृत्यू झाल्यामुळे दोन्ही कुटुंब हादरली आहेत. आदित्यचे वडील आनंद किशोर हे रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत आणि त्यांचा मोठा मुलगा इंडियन ऑइलमध्ये मॅनेजर आहे. लग्नानंतर आदित्य पत्नीसोबत हनिमूनला जाण्याची तयारी करत होता, परंतु त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच उघड होईल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.