लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:52 IST2026-04-14T12:51:11+5:302026-04-14T12:52:10+5:30

गोरखपूरमध्ये भाड्याची नवरी आणि बनावट पोलीस बनून नवरदेवांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

gorakhpur-fake-inspector-and-bride-gang-arrested-marathi-news | लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक

AI Generated Image

एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असा गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये समोर आला आहे. बनावट इन्स्पेक्टर, भाड्याने आणलेली नवरी आणि लग्नाचं नाटक रचून परराज्यातील नवरदेवांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार अंकुर सिंह हा चक्क 'बनावट इन्स्पेक्टर' बनून या लुटीचा खेळ खेळत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या टोळीने हरियाणा आणि राजस्थानमधील अशा तरुणांना लक्ष्य केले होते, ज्यांची लग्ने काही कारणास्तव जमू शकत नव्हती. या तरुणांना उत्तर प्रदेशात सुंदर मुलगी शोधून देण्याचे आमिष दाखवले जायचे. यासाठी टोळीने हरियाणात राजू शर्मा नावाचा एक दलालही नेमला होता. मुलगी पसंत पडल्यानंतर नवरदेवाला सहकुटुंब गोरखपूरला बोलावले जाई.

वरमाला झाली की सुरू व्हायचा खेळ!

लूट करण्याची पद्धत अत्यंत फिल्मी होती. नाच-गाण्याचे काम करणाऱ्या मुलींना पैशांचे आमिष दाखवून 'भाड्याची नवरी' बनवले जायचे. लग्नाचे विधी सुरू असताना हार घालण्याचा विधी पार पडला की, अचानक मुख्य आरोपी अंकुर सिंह पोलीस वर्दीत आपल्या टीमसह तिथे धडकायचा. तो स्वतः इन्स्पेक्टर बनायचा आणि त्याचे साथीदार हवालदार बनून नवरदेवाच्या कुटुंबावर दहशत बसवायचे. "तुम्ही बेकायदेशीरपणे लग्न करत आहात," अशी धमकी देऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याची भीती घातली जायची. या भीतीपोटी नवरदेवाकडील लोक लाखो रुपये देऊन सुटका करून घेत असत.

असा झाला पर्दाफाश

राजस्थानमधील एका तरुणाने या फसवणुकीविरोधात धाडस दाखवत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर गोरखपूर पोलिसांनी तपास चक्रं फिरवली आणि या टोळीच्या सात सदस्यांना बेड्या ठोकल्या. मात्र, या प्रकरणातील मुख्य 'लुटेरी दुल्हन' अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. ती फतेहपूरची रहिवासी असून गोरखपूरमध्ये भाड्याने राहत होती.

पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

एसपी नॉर्थ ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत किती कुटुंबांना अशा प्रकारे लुटले आहे, याचा शोध घेतला जात आहे. फरार नवरीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक फतेहपूरला रवाना झाले असून लवकरच तिलाही जेरबंद केले जाईल.

Web Title : शादी का मंडप या लूट का अड्डा? 'लुटेरी दुल्हन' का पर्दाफाश!

Web Summary : गोरखपुर में एक गिरोह, जो नकली इंस्पेक्टर के नेतृत्व में, दुल्हनों का वादा करके दूल्हों को फंसाता था और शादी समारोह के दौरान उनके परिवारों से उगाही करता था। पुलिस ने सात सदस्यों को गिरफ्तार किया, जबकि 'लुटेरी दुल्हन' अभी भी फरार है।

Web Title : Marriage Mandap or Looting Den? 'Looteri Dulhan' Fraud Unveiled!

Web Summary : A gang in Gorakhpur, led by a fake inspector, lured grooms with promises of beautiful brides, only to extort their families during the wedding ceremony. Police arrested seven members, while the 'Looteri Dulhan' remains at large.