'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 09:43 IST2026-05-18T09:37:56+5:302026-05-18T09:43:20+5:30

ग्रेटर नोएडाच्या जलपुरामध्ये लग्न अवघ्या १४ महिन्यांत एका उच्चशिक्षित तरुणीने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सासरच्यांनी फॉर्च्युनर आणि ५० लाखांच्या हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप आहे.

'Given Scorpio in marriage, now they were asking for Fortuner'; In-laws' persecution! Deepika ended her life within 14 months of marriage | 'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य

'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य

लग्नात गाडी, सोनं आणि कोट्यवधींचा हुंडा देऊनही सासरच्या लोकांची पैशांची हाव काही संपत नाही, याचाच एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारा प्रकार ग्रेटर नोएडाच्या जलपुरा भागातून समोर आला आहे. लग्न अवघ्या १४ महिन्यांतच एका २४ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी तिचा छळ केला आणि शेवटी या त्रासाला कंटाळून तिने छतावरून उडी मारून आपले जीवन संपवले.

दीपिका नागर असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दीपिकाचा पती ऋतिक आणि तिचे सासरे मनोज यांना अटक केली आहे.

१ कोटीचा हुंडा अन् स्कॉर्पिओ देऊनही जावयाची हाव मोठी!

कुडी खेडा गावचे रहिवासी असलेल्या संजय नागर यांची मुलगी दीपिका हिचा विवाह दीड वर्षांपूर्वी जलपुरा गावातील ऋतिक याच्याशी झाला होता. दीपिका ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने तिचे बीए आणि बीएड पूर्ण केले होते. मुलीचे भविष्य चांगले व्हावे आणि ती सुखात राहावी यासाठी तिच्या वडिलांनी लग्नात कोणतीही कसर सोडली नव्हती. कुटुंबियांच्या दाव्यानुसार, त्यांनी लग्नात सासरच्या लोकांना एक आलिशान 'स्कॉर्पिओ' गाडी, जवळपास ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ कोटी रुपयांचा हुंडा दिला होता.

आता हवी होती फॉर्च्युनर आणि ५० लाख!

लग्नाचे काही महिने सुरळीत गेल्यानंतर, पती ऋतिक आणि सासरे मनोज यांनी दीपिकाकडे आणखी हुंड्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. "आम्हाला स्कॉर्पिओ नको, आता 'फॉर्च्युनर' गाडी पाहिजे आणि आणखी ५० लाख रुपये वडिलांकडून आण," असं म्हणत दीपिकाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छळण्यात येऊ लागले. उच्चशिक्षित असलेल्या दीपिकाने या छळाला तोंड देण्याचा प्रयत्न केला, मात्र सासरच्या लोकांचा जाच दिवसेंदिवस वाढतच गेला.

१७ मेच्या रात्री काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, १७ मे रोजी रात्री सासरच्या छळाला आणि रोजच्या भांडणाला कंटाळून हताश झालेल्या दीपिकाने घराच्या छतावरून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, दीपिकाच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की, सासरच्या लोकांनीच तिची हत्या करून तिला छतावरून खाली फेकले आहे.

पती आणि सासऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृत दीपिकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पोलिसांनी वेगाने तपास करत मुख्य आरोपी पती ऋतिक आणि सासरे मनोज यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Web Title : दहेज की मांग से महिला की मौत; पति, ससुर गिरफ्तार।

Web Summary : ग्रेटर नोएडा में दहेज उत्पीड़न से तंग आकर 24 वर्षीय महिला की मौत हो गई। परिवार का आरोप है कि स्कोर्पियो और 1 करोड़ दहेज देने के बाद भी फॉर्च्यूनर और 50 लाख की मांग पूरी न होने पर उसकी हत्या कर दी गई। पति और ससुर गिरफ्तार।

Web Title : Dowry demands lead to woman's death; husband, father-in-law arrested.

Web Summary : A 24-year-old woman in Greater Noida died after alleged dowry harassment. Her family claims she was killed for failing to meet demands for a Fortuner and ₹50 lakhs, despite already providing a Scorpio and ₹1 crore in dowry. Husband and father-in-law arrested.