स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी बडतर्फ पोलिसाने केली रस्त्यावरच्या व्यक्तीची हत्या; उत्तर प्रदेशात थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:41 IST2026-04-16T14:41:48+5:302026-04-16T14:41:48+5:30
उत्तर प्रदेशात एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने एका भिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी बडतर्फ पोलिसाने केली रस्त्यावरच्या व्यक्तीची हत्या; उत्तर प्रदेशात थरार
UP Crime: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातून हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. आपल्यावरील गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आणि जगाच्या नजरेत स्वत:चा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी एका माजी पोलीस हवालदाराने चक्क एका निष्पाप भिकाऱ्याची हत्या करून त्याचे शरीर जाळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.
१२ मार्च रोजी उत्तर-पूर्व रेल्वेच्या हाथरस रोड हॉल्टनजीक एका शेडमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी मृतदेहाजवळ काही ओळखपत्रे आणि सामान सापडले होते, ज्यावरून ही व्यक्ती रामवीर सिंह असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, मृतदेहाची अवस्था आणि सापडलेले पुरावे पाहून रेल्वे पोलिसांना संशय आला.
तपासात धक्कादायक खुलासा
हाथरस जीआरपीचे प्रभारी सुयश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांना या मृत्यू बनावट असल्याचे धागेदोरे सापडले. ज्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते, तो ५५ वर्षीय रामवीर सिंह प्रत्यक्षात जिवंत होता. रामवीर हा उत्तर प्रदेश पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने स्वत:ला मृत घोषित करण्यासाठी भिकाऱ्याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.
स्वत:ची ओळख पटवण्यासाठी रचला कट
रामवीरने हत्या केल्यानंतर मृतदेहाच्या जवळ स्वतःचे ओळखपत्र आणि वैयक्तिक वस्तू ठेवून दिल्या. जेणेकरून पोलिसांना वाटेल की रामवीरचाच मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यावेळी तो स्वतःही काही प्रमाणात भाजला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास केला आणि १४ एप्रिल रोजी रामवीरला मैनपुरी जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
आरोपी रामवीर सिंह हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर फिरोजाबाद, अलीगड, मुरादाबाद, हरदोई, मैनपुरी आणि बदायूं यांसारख्या अनेक जिल्ह्यांत अपहरण, हत्या, लूटमार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कृत्यांमुळेच त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
भिकाऱ्याची ओळख अद्याप अपूर्ण
रामवीरने ज्या वृद्ध भिकाऱ्याची हत्या केली, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तो साधूच्या वेशात तिथे राहत असल्याचे समजते. पोलीस सध्या या त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत. रामवीरने स्वतःच्या मृत्यूचा बनाव नेमका कशासाठी रचला? तो कोणत्या मोठ्या गुन्ह्यातून वाचण्याचा प्रयत्न करत होता? याचा तपास आता पोलीस करत आहेत.