सायबर क्रॅकडाऊन! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 'ऑपरेशन सायहॉक'मध्ये १००० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:02 IST2026-02-07T11:59:23+5:302026-02-07T12:02:10+5:30
दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या जाळ्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

फोटो - ndtv.in
दिल्लीपोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या जाळ्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन सायहॉक' (Operation CyHawk) अंतर्गत पोलिसांनी १००० हून अधिक व्यक्तींना अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये पसरलेल्या संघटित सायबर फ्रॉड सिंडिकेट्सना मुळासकट उखडून टाकण्यासाठी राबवण्यात आली.
ऑपरेशन सायहॉक ३.० सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात दिल्ली पोलिसांनी 'ऑपरेशन सायहॉक ३.०' अंतर्गत ५०० हून अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक्टिव्ह असलेल्या संघटित सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना टार्गेट करण हा होता.
या कारवाईमध्ये प्रगत तांत्रिक तपास, रिअल-टाइम इंटेलिजन्स, आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणं आणि सायबर गुन्हेगारी टोळ्यांची ओळख पटवून त्या नष्ट करण्यासाठी एकात्मिक मोहिमेचा समावेश होता.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ही कारवाई सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी, नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वाढता गैरवापर रोखण्यासाठीच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. येत्या काळात ही मोहीम सुरू राहील, ज्यामध्ये देखरेख आणि अंमलबजावणीची कारवाई वाढेल.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ऑपरेशन सायबर हॉक अंतर्गत दिल्ली पोलिसांच्या पूर्व जिल्ह्याने दिल्ली ते उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि बरेली येथे कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला. मोहम्मद वसीमसह आठ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर बनावट बँक खाती चालवण्याचा आरोप आहे.