एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:57 IST2026-05-19T10:51:58+5:302026-05-19T10:57:50+5:30

गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील शांतीगिरी गोस्वामी हत्याकांडाचा अहमदाबाद क्राईम ब्रांचने ८ महिन्यांनंतर थरारक खुलासा केला आहे. वासनांध पत्नी जागृतीने ४ प्रेमिकांच्या मदतीने पतीचा काटा काढला होता.

4 lovers of the same woman; Husband saved despite giving betel nut, ended up on the bed with a pillow! You will feel pain after hearing this | एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा

एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा

गुन्हेगारी जगतात अनैतिक संबंध आणि वासनेपोटी जोडीदाराचा काटा काढल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, गुजरातच्या सुरेंद्रनगरमधून समोर आलेली मर्डर मिस्ट्री वाचून तुमचेही डोके चक्रावून जाईल. एका ५० वर्षांच्या महिलेने आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आले होते, मात्र अहमदाबाद क्राईम ब्रांचने तब्बल ८ महिन्यांनंतर या प्रकरणाचा असा काही खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच हादरले.

जागृती गोस्वामी (वय ५०) असे या लेडी 'मास्टरमाइंड' पत्नीचे नाव असून, तिने तिचा मुख्य प्रियकर कांतिलाल उर्फ भरत साबरिया (वय ५४) याच्यासोबत मिळून पती शांतीगिरी गोस्वामी यांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येमध्ये आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात तिचे एकूण ४ प्रियकर वेगवेगळ्या टप्प्यावर सामील होते.

सख्ख्या दिरासोबत पळाली!

अहमदाबाद क्राईम ब्रांचचे एसीपी भरत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला जागृतीचे पहिले लग्न सुखदेवगिरी गोस्वामी याच्याशी झाले होते, ज्याच्यापासून तिला दोन मुले आहेत. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच जागृतीचे मन तिच्या सख्ख्या दिरावर म्हणजेच नवऱ्याच्या मोठ्या भावावर जडले. दोघांचे प्रेम इतके वाढले की, जागृती आपल्या दोन लहान मुलांना आणि पहिल्या नवऱ्याला सोडून दीर शांतीगिरीसोबत पळून गेली. दोघांनी लग्न केले आणि दुसऱ्या गावात भाड्याचे घर घेऊन राहू लागले.

दुसरा नवरा बाहेर गेला अन् तिसऱ्या प्रियकराची एंट्री!

जागृतीचा दुसरा पती शांतीगिरी हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होता. तो जेव्हा माल घेऊन ट्रिपवर जायचा, तेव्हा २० ते २५ दिवसांनी घरी परतायचा. पतीच्या याच अनुपस्थितीचा आणि एकटेपणाचा फायदा घेत जागृतीने शेजारी राहणाऱ्या कांतिलाल उर्फ भरत साबरिया नावाच्या इसमाशी सूत जुळवले. कांतिलाल जागृतीच्या प्रेमात इतका वेडा होता की, त्याने मुद्दाम शांतीगिरीशी मैत्री केली आणि त्यांच्या घराशेजारीच एक खोली भाड्याने घेतली. शांतीगिरी बाहेर गेला की कांतिलाल आणि जागृतीच्या भेटीगाठी सुरू व्हायच्या.

सुपारी किलरने दिला २५ हजारांचा धोका

जेव्हा जेव्हा शांतीगिरी ट्रिपवरून घरी परतायचा, तेव्हा तो जागृती आणि कांतिलालच्या प्रेमात अडथळा ठरायचा. अखेर दोघांनी त्याला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन आखला. त्यांनी युनिस नावाच्या एका सराईत गुन्हेगाराला शांतीगिरीला संपवण्यासाठी २५ हजार रुपयांची सुपारी दिली. युनिस एका रात्री शांतीगिरीला मारण्यासाठी त्याच्या खोलीत घुसून उभा राहिला, पण झोपलेल्या शांतीगिरीला पाहून त्याची हिम्मत झाली नाही. यानंतर युनिसने एक शक्कल लढवली; त्याने झोपलेल्या शांतीगिरीचा मोबाईलवर फोटो काढला आणि जागृतीला पाठवून "काम फत्ते झाले" असे खोटे सांगितले आणि २५ हजार रुपये घेऊन पसार झाला.

नवऱ्याला चहा पिताना पाहून उडाली झोप!

दुसऱ्या दिवशी सकाळी जागृतीने जेव्हा तिच्या नवऱ्याला जिवंत, घराबाहेर कट्ट्यावर चहा पिताना पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ प्रियकर कांतिलालला बोलावून घेतले. सुपारी किलरने फसवल्याचे समजताच आता दोघांनी स्वतःच त्याला संपवायचे ठरवले.

बेडवरच उशीने दाबले तोंड अन्...

संधी मिळताच जागृती आणि कांतिलालने घरात शांतीगिरीला एकटे गाठले. प्रियकर कांतिलालने शांतीगिरीचा गळा आवळला, तर खूनी पत्नी जागृतीने पलंगावरील उशी काढून पतीच्या तोंडावर आणि नाकावर ठेवून ती तोपर्यंत दाबून धरली, जोपर्यंत त्याची धडधड शांत झाली नाही. हत्या केल्यानंतर दोघांनी घाबरून शांतीगिरीचा मृतदेह बेडच्या मागे लपवून ठेवला.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौथ्या प्रियकराला फोन!

आता सर्वात मोठे आव्हान होते मृतदेहाची विल्हेवाट लावणे. यासाठी जागृतीने तिचा चौथा प्रियकर दीपक उर्फ मुन्ना याला फोन केला. दीपकही तिच्या प्रेमात आंधळा होता. दीपकने मित्राची कार मागून आणली. त्यानंतर जागृती, प्रियकर कांतिलाल आणि दीपक या तिघांनी मिळून शांतीगिरीचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि धांगध्रा येथील एका नाल्यात फेकून दिला, जेणेकरून सगळ्यांना हा अपघात वाटावा. गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून "शांतीगिरीला लांब एका शहरात चांगली नोकरी लागली आहे, तो तिथेच ट्रक चालवतोय आणि त्याचा मोबाईल नंबर बदलला आहे," अशी अफवा जागृतीने पसरवली.

क्राईम ब्रांचने आवळला फास; पहिल्या नवऱ्याचे मोठे मन!

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सापडलेल्या मृतदेहाची फाईल स्थानिक पोलिसांनी 'अपघाती मृत्यू' म्हणून बंद केली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या दोन पीएसआय आणि १० जवानांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी सलग दोन महिने तपास करत या भयानक हत्याकांडाचा छडा लावला. सध्या जागृती आणि कांतिलाल पोलिसांच्या कोठडीत आहेत.

या संपूर्ण कहाणीत सर्वात थक्क करणारी आणि मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे, जागृतीचा पहिला नवरा सुखदेवगिरी हा आजही आपल्या स्वतःच्या दोन मुलांसह, जागृती आणि शांतीगिरीच्या मुलाचाही सांभाळ अतिशय प्रेमाने एकटाच करत आहे.

Web Title : महिला ने प्रेमियों संग मिलकर पति को मारा, सुपारी किलिंग विफल!

Web Summary : गुजरात में एक महिला ने चार प्रेमियों के साथ मिलकर पति की हत्या कर दी। सुपारी किलिंग विफल होने पर महिला और उसके प्रेमी ने गला घोंट दिया। अन्य प्रेमियों ने शव ठिकाने लगाने में मदद की। क्राइम ब्रांच ने महीनों बाद मामला सुलझाया। पहला पति सभी बच्चों की देखभाल करता है।

Web Title : Woman Kills Husband with Lovers After Failed Contract Killing

Web Summary : A Gujarat woman, with four lovers, murdered her husband after a failed contract killing attempt. She and her main lover suffocated him. Other lovers helped dispose of the body. Crime Branch solved the case months later. The first husband cares for all the children.