दुष्काळाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चावर धोऽऽ धो पाऊस!

By Admin | Updated: August 23, 2014 00:49 IST2014-08-23T00:36:24+5:302014-08-23T00:49:31+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज भाजपातर्फे क्रांतीचौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला

Wash the rain on the demand for drought! | दुष्काळाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चावर धोऽऽ धो पाऊस!

दुष्काळाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चावर धोऽऽ धो पाऊस!

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज भाजपातर्फे क्रांतीचौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा अर्ध्या किलोमीटरवर गेल्यानंतर पैठणगेट येथे धोऽऽ धो पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबतच नसल्याने नेत्यांनी नंतर विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.
मराठवाड्यातील जनता दुष्काळामुळे होरपळून निघत असताना शासनाने दुष्काळ जाहीर न करता फक्त टंचाई जाहीर केली. मराठवाड्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शुक्रवारी दुपारी क्रांतीचौक येथून मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चा पैठणगेट येथे पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आसपासच्या दुकानांसमोर नागरिक धावपळ करू लागले. पाऊस थांबत नसल्याचे पाहून सर्व नेते उघड्या जीपमध्येच विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचले.
कार्यालयाच्या परिसरात सकाळपासून अनेक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक तळ ठोकून होते. काही मोर्चेकरी आपल्या वाहनांद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचले. विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १५ हजार रुपये व बागायती शेतकऱ्यांना २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, गारपीटग्रस्त व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, ज्ञानोबा मुंढे, एकनाथराव जाधव, अतुल सावे, शिरीष बोराळकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये, संजय केणेकर, बस्वराज मंगरुळे, तारुअप्पा मेटे, सुरेश बनकर, सुरेंद्र साळुंके यांच्यासह मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. विशेषत: बीड जिल्ह्यातील नागरिकांचा मोठ्या संख्येने समावेश होता. तत्पूर्वी एका कार्यक्रमात महावीर पाटणी आणि पंजाबराव वडजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल
मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मराठवाड्यात आत्महत्या, दुष्काळ असतानाही सरकार लक्ष द्यायला तयार नाही. आता हे सरकार सत्तेतून खाली खेचून महायुतीचे सरकार आणणे आवश्यक आहे. सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी निर्धार करावा, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी पंकजा पालवे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Wash the rain on the demand for drought!