दीड तास धो ऽ ऽ धो पाऊस

By Admin | Updated: August 23, 2014 00:49 IST2014-08-23T00:40:45+5:302014-08-23T00:49:06+5:30

औरंगाबाद : आज शुक्रवारी दुपारी शहरात दीड ते दोन तास धोऽऽधो पाऊस पडला.

Wash for one and a half hours to wash | दीड तास धो ऽ ऽ धो पाऊस

दीड तास धो ऽ ऽ धो पाऊस

औरंगाबाद : आज शुक्रवारी दुपारी शहरात दीड ते दोन तास धोऽऽधो पाऊस पडला. या पावसाने महानगरपालिकेच्या कामाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पाडले. लहान-मोठ्या नाल्यात गाळ साठल्याने ते पाणी रस्त्यावर आले. ड्रेनेज चोकअप झाल्याने वसाहतींमध्ये पाणी शिरले. यामुळे अनेकांची धांदल उडाली. मदतीसाठी शेकडो हात पुढे आले. घरातून पाणी बाहेर काढण्यापासून ते नाल्यातील गाळ काढण्यापर्यंतचे काम नागरिकांनी केले.
शहरावर दुपारी अचानक ढग दाटून आले होते. यामुळे दुपारी ३ वाजता सायंकाळ झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. आज जोरदार पाऊस पडणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रिमझिम सरीने पावसाला सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोर वाढला. अवघ्या दीड ते दोन तासांत ३३.६ मि. मी. पावसाची नोंद झाल्याचे चिकलठाणा वेधशाळेने सांगितले.
या पावसाने शहरातील खोलगट भागात पाणी साचले होते. काही गल्ल्यांना तर तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिडको एन-९, एम-२ भागातील पवननगरात नाल्या तुंबल्याने पाणी आसपासच्या वसाहतीमध्ये शिरले. येथील एका कॉम्प्लेक्सच्या तळघरात पाणी शिरले होते. येथील रहिवाशांच्या मदतीला आसपासचे नागरिक धावून आले. काही जण नाल्यातील तुंबलेला गाळ काढण्याचा प्रयत्न करीत होते.
औरंगाबाद : रहेमानिया कॉलनीत गल्ली नंबर ११ मधील संपूर्ण घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. घरातून पाणी बाहेर काढणे, पाण्यात तरंगणाऱ्या वस्तू उंच ठिकाणी ठेवण्यासाठी आसपासच्या परिसरातील तरुणांची मोठी मदत येथील रहिवाशांना झाली. नाली तुंबल्याने व रस्त्यावर मोठा खोलगट भाग असल्याने रशीदभाई बेकरीवाले यांच्या बेकरीमध्ये पाणी शिरले होते. रहेमानिया कॉलनीतील नाल्याच्या सफाईकडे मनपाने दुर्लक्ष केल्यानेच आज नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी व्यक्त केल्या. एन-८ परिसरातील जजेस कॉलनीतील रस्त्याच्या खोलगट भागात पाणी साचले होते. येथे बच्चे कंपनी या पाण्यातून जोरात सायकल नेत पाणी उडविण्याचा आनंद घेत होती.
सिटीचौक पोलीस स्टेशनमागील नाल्या तुडुंब भरल्याने पुलावरून पाणी वाहत होते. टाऊन हॉल चौकातही कंबरेइतके पाणी साचले होते.
टाऊन हॉल चौकाचे तळ्यात रूपांतर झाले होते. घाटीच्या प्रवेशद्वारात पाणी साचल्याने नागरिकांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागली. पोलीस आयुक्तालयासमोरही पाणी तुंबले होते. याशिवाय पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, भरतनगर या परिसरातही काही घरात पाणी शिरले होते. तसेच संजयनगर, बायजीपुऱ्यातही अनेक गल्ल्यांमध्ये पाणी तुंबले होते. टिळकपथ रोडवर पाणी साठून काही दुकानांतही पाणी शिरले. सायंकाळी पावसाची भुरभुर सुरू होती.

कॅप्शन
रहेमानिया कॉलनीतील ११ नंबर गल्लीत पाणी शिरले होते.
सिडको एन-८ परिसरातील काही गल्ल्यांत पाणी साचले होते.

Web Title: Wash for one and a half hours to wash