बीडच्या दावणीला थेट विदर्भातील चारा !

By Admin | Updated: January 4, 2016 00:08 IST2016-01-03T23:20:28+5:302016-01-04T00:08:23+5:30

संजय तिपाले , बीड खरीप हंगामात अपेक्षित चारा उत्पादन न झाल्याने गुरांना जगविणे दिवसेंदिवस मुश्किल बनू लागले आहे. दुष्काळामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चारा संपला आहे.

Vidarbha fodder directly to Beed! | बीडच्या दावणीला थेट विदर्भातील चारा !

बीडच्या दावणीला थेट विदर्भातील चारा !


संजय तिपाले , बीड
खरीप हंगामात अपेक्षित चारा उत्पादन न झाल्याने गुरांना जगविणे दिवसेंदिवस मुश्किल बनू लागले आहे. दुष्काळामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चारा संपला आहे. त्यामुळे छावण्यांमधील गुरांसाठी थेट विदर्भातून चारा उपलब्ध करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ इतकी गुरे आहेत. अल्पपर्जन्यमानामुळे आॅगस्ट २०१५ पासूनच चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात छावण्यांना सुरुवात झाली. आजघडीला मंजूर छावण्यांची संख्या १०३ इतकी आहे. त्यापैकी ८६ छावण्या सुरु असून ५४ हजारावर जनावरे आश्रयाला आहेत. बहुतांश छावण्यांमध्ये गुरांना चारा म्हणून ऊस दिला जात आहे. मात्र, आता ऊसाचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. अडीच हजार रुपये टन एवढ्या दरानेही ऊस देण्यास उत्पादक तयार नाहीत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये चाराटंचाईची स्थिती बीडपेक्षा वेगळी नाही. त्यामुळे चाऱ्याची जमवाजमव करण्यासाठी छावणीचालकांना मराठवाड्याबाहेर जावे लागले आहे.
बीड तालुक्यातील पालवण येथील यशवंत बहुद्देशीय संस्थेच्या छावणीत दोन दिवसांपूर्वीच अमरावतीतून ७० टन तुरीचे भुस्कट आणले आहे. वाहतूक खर्चासह प्रतिटन ९ हजार रुपये मोजावे लागले आहेत. बीडमध्ये यंदा सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा आहे. मात्र, पावसाअभावी वाढ खुंटली असून ज्वारीचे बाटूक झाले आहे. ४ लाख १८ हजार मे. टन एवढाच चारा ज्वारीपासून उपलब्ध होऊ शकतो. काढणी नसल्यामुळे चाराटंचाई अधिक तीव्र होणार आहे. तथापि, सतत ऊस खाल्ल्याने जनावरांना पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भातून मागविले जाणारे भुस्कट तूर्त ऊसाला पर्याय मानले जात आहे.

Web Title: Vidarbha fodder directly to Beed!