सातारा/देवळाई : येथील शिवाजीनगर भुयारी मार्गात बुधवारी (ता. ६) दिवसभरात चार जड वाहने अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारी सुमारे १ वाजता हायवा अडकल्यानंतर संध्याकाळी पावणे सहा वाजता बस, त्यानंतर काही वेळातच टेम्पो आणि पुन्हा तासाभरात ७:४५ वाजता आयशर ट्रक अडकल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली.
बुधवारी दुपारी भरउन्हात सुमारे एक वाजेच्या सुमारास हायवा अडकल्याने एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुपारची वेळ असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीसोबतच कडक उन्हाला सामोरे जाण्याची वेळ आली. देवळाई चौकात अडकलेला हायवा बरेच प्रयत्न करून काढण्यात आला. तोपर्यंत अनेक वाहनधारकांनी वाहने माघारी घेऊन पर्यायी मार्ग निवडले.
संध्याकाळी ६:४५ वाजता...
यानंतर संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास कामगारांना ने-आण करणारी एक बस देवळाई चौकातील लोखंडी चौकटीत अडकून बसच्या वरील पत्र्याचा एक भाग तुटून पडला. यातच काही चारचाकी वाहनचालकांनी दोन्ही बाजूंनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक अधिकच ठप्प झाली.
काही वेळातच टेम्पो...
बस मार्गस्थ होते न होते तोच काही वेळातच टेम्पो या लोखंडी चौकटीत अडकली. पुन्हा तेच कोंडीचे दृश्य रस्त्यावर दिसू लागले.
संध्याकाळी ७:४५ वाजता आयशर...
शिवाजीनगर येथून एक आयशर ट्रक (क्र. एमएच २५ एजे ८६९७) देवळाई चौकाकडे जाताना लोखंडी चौकटीत अडकला. वाहनाच्या टायरमधील हवा सोडून अर्धा तासाने तो पास होऊ शकला. परिणामी, देवळाई परिसरातील तिन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. रात्री कामावरून घरी जाणारे कामगार व खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना मनस्ताप सहन करावा लागला.
एक सर्व्हिस रोड पूर्ण होतोय... दुसरा अपूर्णच...
या घटनेमुळे भुयारी मार्गाच्या नियोजनावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाहतूक पोलिस घटनास्थळी उपस्थित असताना ही कोंडी सुरळीत करण्यासाठी सुमारे तासभर वेळ लागला. शिवाजीनगर बाजूच्या अर्धवट राहिलेल्या एका सर्व्हिस रोडचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना काही दिवसांत या सर्व्हिस रोडचा वापर करता येईल. मात्र, देवळाई चौकातील एका बाजूचा सर्व्हिस रोड अद्यापही अपूर्ण आहे.
Web Summary : Shivanagar underpass witnessed severe traffic jams as four heavy vehicles got stuck within seven hours. The incidents, involving a Hyva, bus, tempo, and truck, caused major disruptions. An incomplete service road exacerbates congestion, frustrating commuters and raising concerns about planning.
Web Summary : शिवाजीनगर अंडरपास में सात घंटों के भीतर चार भारी वाहन फंसने से गंभीर ट्रैफिक जाम लग गया। हाइवा, बस, टेम्पो और ट्रक से जुड़ी घटनाओं ने भारी व्यवधान उत्पन्न किया। एक अधूरा सर्विस रोड भीड़भाड़ को बढ़ाता है, जिससे यात्रियों में निराशा है और योजना के बारे में चिंता बढ़ रही है।