निदा खानला आश्रय दिलेल्या घरासह तीन मालमत्ता भुईसपाट; पटेल कुटुंबीयांची हार देऊन गांधीगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 19:36 IST2026-05-14T19:28:48+5:302026-05-14T19:36:25+5:30
सकाळी ६:१५ वाजेपासून महापालिका, पोलिसांची संयुक्त कारवाई, कारवाईला कुठेही नागरिकांकडून विरोध नाही

निदा खानला आश्रय दिलेल्या घरासह तीन मालमत्ता भुईसपाट; पटेल कुटुंबीयांची हार देऊन गांधीगिरी
छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील निदा खान या आरोपी महिलेला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने नारेगाव येथील आपल्या एका घरात आश्रय दिल्याप्रकरणी बुधवारी सकाळी महापालिका प्रशासनाने त्याच्या तीन मोठ्या मालमत्ता अवघ्या अडीच तासांत जमीनदोस्त केल्या.
या घटनेनंतर शहरात बुलडोझर संस्कृतीचा उदय झाल्याचा प्रत्यय नागरिकांना आला. मतीनचे २४०० चौरस फुटांचे राहते घर पाडायला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांनी मनपा अधिकारी, पोलिसांचे पुष्पहार घालून स्वागत केले. फुलांचा वर्षाव केला. संविधानाची प्रत भेट देऊन गांधीगिरी केली.
महापालिकेने मतीनच्या तिन्ही मालमत्तांना अगोदर ३ दिवसांची नोटीस दिली. मंगळवारी सकाळी २४ तासांची मुदत देणारी नोटीस चिटकवली. खंडपीठानेही मतीनला दिलासा दिला नाही. त्यानंतर रात्रीतून महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईची तयारी सुरू केली. या कारवाईची कुणकुण लागताच एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील रात्री १२ वाजता नारेगावात दाखल झाले. त्यांच्यासोबत ३४ नगरसेवक, कार्यकर्ते होते. जलील यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेत कार्यकर्त्यांना शांत केले. सकाळी गांधीगिरी करीत मनपा अधिकाऱ्यांचे स्वागत करावे, असे आवाहन केले. यानंतर नारेगावातील तणावसदृश परिस्थिती निवळली.
पहाटे ५ वाजता पथक गरवारेवर
महापालिका, पोलिसांचे पथक पहाटे ५ वाजता गरवारे क्रीडा संकुलात आले. ५:३० वाजता ७ जेसीबी, १ पोकलेन, ९ टिप्पर, अग्निशमन विभागाची दोन वाहने, दोन रुग्णवाहिका, विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी दोन लॅडरसह ताफा नारेगावच्या दिशेने एका रांगेत निघाला. दोन सहायक पोलिस आयुक्त, ५ पोलिस निरीक्षक, २५० पोलिस कर्मचारी, मनपाचे सर्व १० झोन अधिकारी, ५० पेक्षा अधिक कर्मचारी, नागरी मित्र पथकांचे ८० माजी सैनिक ६ वाजता नारेगाव येथे मतीनच्या घरासमोर पोहोचले.
मनपा अधिकाऱ्यांसोबत गांधीगिरी
मतीनच्या पत्नीसह कुटुंबीयांनी आधीच मनपा अधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली होती. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांना पुष्पहार घातला. फुलांची उधळण केली. त्यानंतर मतीनच्या सहा वर्षांच्या मुलीने संविधानाची प्रत देऊन शहरात अन्यत्र अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मतीनच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. जड अंत:करणाने त्यांनी घराजवळून माघार घेतली.
सहा दुकाने, राहते घर
नारेगाव येथील मुख्य रस्त्यावरच मतीनचे २४०० चौरस फुटाचे राहते घर होते. दर्शनी भागात सहा दुकाने होती, पाठीमागे घर होते. या ठिकाणी एकाच वेळी चार जेसीबी लावून पाडापाडीला सुरुवात झाली. एवढ्या सकाळीही नारेगाव भागात बघ्यांची प्रचंड गर्दी होती. संपूर्ण इमारत जमीनदोस्त करायला वेळ लागत असल्याने पोकलेनची मदत घेण्यात आली. जवळपास २ तासांच्या अथक परिश्रमानंतर इमारत जमीनदोस्त झाली.
गुंठेवारी असूनही कारवाई
मतीनच्या भिंतीला लागून लोखंडी सळया व अन्य साहित्य विक्रीचे अमजद खान यांचे शेड होते. हे शेडही मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने काही वेळातच पाडून टाकले. विशेष बाब म्हणजे शेडमध्ये लाखो रुपयांचे सामान पडून होते. खान हे माजी नगरसेवक निसार खान यांचे भाऊ आहेत. त्यांनी वारंवार गुंठेवारी केल्याचे प्रमाणपत्र असल्याचे सांगितले, पण त्यांचे कोणीही ऐकले नाही.
नाल्याला लागूनच कार्यालय
मतीनचे घराजवळील नाल्याला लागूनच पत्र्याच्या शेडमध्ये कार्यालय उभारले होते. एका जेसीबीने अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हे कार्यालयही जमीनदोस्त केले. कार्यालयातील सामानही मतीनच्या कुटुंबीयांनी अगोदरच काढून घेतले होते. सकाळी ८ वाजेपर्यंत कारवाई पूर्ण झाली.
मनपाचा ताफा कौसर पार्ककडे
महापालिका आणि पोलिसांचा ताफा तेथून थोडे लांब असलेल्या कौसर पार्क भागात गेला. ज्या घरात निदा खानला आश्रय दिला होता, त्या घराला अगोदरच पोलिसांनी वेढा घातला होता. ८:०६ मिनिटांनी दोन जेसीबीच्या आधारे घर पाडायला सुरुवात झाली. या इमारतीचे बांधकाम एवढे निकृष्ट होते की, मनपाने पाडले नसते, तरी इमारत दोन-तीन वर्षांत कोसळली असती. बेसमेंटमध्ये निव्वळ काळी माती होती. भिंतींना जेसीबीचा धक्का लागताच त्या ढासळत होत्या. इमारतीच्या मध्यभागीचा कॉलम दोन धक्के देताच कोसळला. त्यानंतर इमारत हलू लागली. १८ ते २० मिनिटांत इमारत जमीनदोस्त करण्यात आली.