पत्नीचे लग्नानंतरही प्रियकराशी अनैतिक संबंध; पतीने सासुरवाडीत जाऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:50 IST2026-05-12T16:46:49+5:302026-05-12T16:50:01+5:30
: पत्नी, प्रियकर आणि सासू-सासऱ्यांची रवानगी पोलीस कोठडीत; नाशिकला बदली होऊनही पिच्छा सोडला नाही.

पत्नीचे लग्नानंतरही प्रियकराशी अनैतिक संबंध; पतीने सासुरवाडीत जाऊन संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर : लग्नानंतरही पत्नीने पूर्वीच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध कायम ठेवले. नातेवाइकांची बैठक घेऊन पत्नीला समजावून सांगितले. मात्र,पत्नीच्या वागण्यात काही बदल झाला नाही. शेवटी पतीने शहरातून नाशिकला बदली करून घेतली, तरीही पत्नीच्या वागणुकीत फरक पडला नाही. आपल्या दोन मुलांना भेटण्यासाठी पती सासूरवाडीला गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्याने विषारी औषध प्राशन केले. १५ दिवसांच्या उपचारानंतर पतीची ७ मे रोजी प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पत्नीसह तिचा प्रियकर आणि सासू-सासऱ्यांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींमध्ये पत्नी वैष्णवी कृष्णा गरड, तिची आई मीरा नागनाथ सोनवणे, वडील नागनाथ बलभीम सोनवणे आणि प्रियकर कृष्णा दांडगे यांचा समावेश आहे. कृष्णा अण्णासाहेब गरड असे मृत पतीचे नाव आहे.
मृताचे वडील अण्णासाहेब गरड यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा कृष्णा आणि आरोपी वैष्णवी यांचा विवाह सात वर्षापूर्वी झाला. या दाम्पत्यास दोन मुले आहेत. सुरुवातीला दाम्पत्य आई-वडिलांसोबत तीन वर्षे सोबत राहिले. त्यानंतर वैष्णवीने कृष्णाला वडिलांकडून गारखेडा परिसरात भाड्याचे घर घेऊन तिथे राहण्यास भाग पाडले. वैष्णवीच्या मोबाइलवर एका मोबाइल क्रमांकाहून सतत फोन येत होते. पतीने चौकशी केली तेव्हा तिने चुलत भावाचा नंबर असल्याचे सांगितले. फेब्रुवारी २०२५ मध्ये तोच तरुण घरी येत होता. त्याविषयी घरमालकाने वैष्णवीला विचारल्यानंतर तिने कृष्णा दांडगे असे नाव सांगून चुलत भाऊ असल्याचे सांगितले.
प्रेमसंबंध माहिती असूनही लावले लग्न...
याविषयी कृष्णा गरडने वैष्णवीचे आई-वडील, भाऊ आकाश यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी लग्नापूर्वीच दोघांचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. तसेच मुलीला समजावून सांगण्याऐवजी जावयालाच पुरावे मागितले. यावर पतीने पत्नीच्या प्रियकराला फोन करून समजावले. तर त्याने उलट त्यालाच धमकी दिली. नंतर कृष्णाने पुण्याला नोकरी शोधली, त्यानंतर नाशिकला गेला. १८ एप्रिल रोजी शहरात आल्यानंतर २२ एप्रिल रोजी मुलांची आठवण येत असल्यामुळे तो सासूरवाडीत त्यांना भेटण्यासाठी गेला. त्याच ठिकाणी त्याने विषारी औषध प्राशन केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना कृष्णाची ७ मे रोजी प्राणज्याेत मालवली.
आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी
एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपी वैष्णवी गरड, मीरा सोनवणे, नागनाथ सोनवणे आणि प्रियकर कृष्णा दांडगे यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक लखनसिंग पाचलोरे करीत आहेत.