भडकल गेटवर होणार 'लाईम प्लास्टर'ची जादू; ऐतिहासिक सौंदर्याला मिळणार झळाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:05 IST2026-05-12T15:01:02+5:302026-05-12T15:05:01+5:30
ऐतिहासिक भडकल गेटचे होणार मजबुतीकरण; जुने सिमेंट काढून होणार विशेष वॉटरप्रूफिंग, पुरातत्त्व विभागाचा मोठा निर्णय.

भडकल गेटवर होणार 'लाईम प्लास्टर'ची जादू; ऐतिहासिक सौंदर्याला मिळणार झळाळी
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरातील भडकल गेटच्या दुरुस्ती आणि संवर्धनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. स्मारकावरील जुने सीमेंट प्लास्टर काढून नव्याने लाइन प्लास्टर करण्यात येणार असून, गळती रोखण्यासाठी विशेष वॉटरप्रूफिंगची कामे केली जाणार आहेत.
आजघडीला भडकल गेटवर जागोजागी झाडेझुडपे वाढली आहेत. ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून स्मारकाच्या मजबुतीकरणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. यात दरवाजाचे मजबुतीकरण, खिळखिळ्या झालेल्या भागांची दुरुस्ती, ढासळलेले किंवा कमकुवत झालेले प्लास्टर काढणे, नव्याने पॉइंटिंग करणे, दगडी लाइनमधील भेगा भरणे इ. कामांचा समावेश आहे. स्मारकात गळती होत असल्याने गळती प्रतिबंधक उपायांवर विशेष भर दिला जाणार आहे. शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेल्या भडकल गेटच्या जतनासाठी हाती घेतलेल्या या कामामुळे स्मारकाचे सौंदर्य आणि टिकाव वाढण्यास मदत होईल.
कशी आहे भडकल गेटची रचना?
निजामाचे वजीर मलिक अंबर यांनी मुगल सुभेदार अब्दुल्लाह खानवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ भडकल गेटची उभारणी केली. भडकल गेटच्या बांधकामासाठी वापरलेले तंत्रज्ञान हे शहरातील इतर दरवाजे आणि इमारतींसाठी त्या काळात वापरलेल्या तंत्रज्ञानापेक्षा वेगळे आहे. धारदार व उर्ध्वलंब फासळ्यांनी युक्त घुमटाकृती छप्पर ही पद्धत त्या काळी भडकल गेट दरवाजात प्रथमच वापरण्यात आली. हे गेट दुमजली आहे. खालील भागात दोन्ही बाजूंनी कमानीयुक्त खोल्या आहेत. पहिल्या मजल्यास नगरखाना म्हणतात. यावर जाण्यासाठी दक्षिणेकडील बाह्य भागातून पायऱ्या आहेत.
६ महिन्यांचा कालावधी
भडकल गेटवरील सीमेंट काढणे, वाॅटरप्रूफिंग इ. कामे होतील. पावसाळा वगळून ६ महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
- जया वाहणे, साहाय्यक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग