पोषण आहारावर पथकाची नजर
By Admin | Updated: September 30, 2014 01:25 IST2014-09-30T00:13:03+5:302014-09-30T01:25:50+5:30
उस्मानाबाद : शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी

पोषण आहारावर पथकाची नजर
उस्मानाबाद : शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाचे गठन केले आहे. शाळांमधील आहाराची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम ही समिती आता करणार आहे. यामुळे पोषण आहार योजनेतील काळा बाजार बंद होऊन पोषण आहार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचण्यास मदत होणार आहे. दरम्यान, सध्या उस्मानाबाद, औरंगाबादसह सहा जिल्ह्यात ही तपासणी करण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळावेत, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगवेगळ्या पध्दतीचा आहार ठरवून देण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना पुरवठा विभागामार्फत तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत अन्य साहित्य पुरविले जाते. असे असले तरी अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या आहारामध्ये सातत्य नसल्याचे तसेच पुरविल्या जात असलेल्या तांदूळ आणि अन्य साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात होत असतात. याशिवाय आवश्यक त्या प्रमाणात आहार शिजविला जात नसल्याचेही शासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
याची दखल घेऊन राज्य शासनाने आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाचे गठण केले आहे. या पथकामार्फत शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्यात येणार आहे. हे पथक अंमलबजावणीची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना सूचविणारा अहवाल शासनाला सादर करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या तपासणीतून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात सदर योजना कशा पध्दतीने राबविली जाते, हेही समोर येणार आहे. (प्रतिनिधी)