साताऱ्यात आतापर्यंत २८ इमारतींवर घाव

By Admin | Updated: December 18, 2014 00:42 IST2014-12-17T23:54:40+5:302014-12-18T00:42:25+5:30

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिषदेने आतापर्यंत २८ अतिरिक्त बांधकामांवर घाव घातले असून, २६ इमारतींना ‘जैसे थे’ आदेश मिळाला आहे.

So far, 28 buildings have been damaged in Satara | साताऱ्यात आतापर्यंत २८ इमारतींवर घाव

साताऱ्यात आतापर्यंत २८ इमारतींवर घाव

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिषदेने आतापर्यंत २८ अतिरिक्त बांधकामांवर घाव घातले असून, २६ इमारतींना ‘जैसे थे’ आदेश मिळाला आहे. १८ डिसेंबर रोजी अंतिम तारखेला न्यायालयातील चर्चेअंती पुढील कार्यवाही स्पष्ट होणार असल्याने त्याकडे सातारा- देवळाईवासीयांचे लक्ष लागले आहे.
न.प.ने आज दोन कामांवर हातोडा चालविला. गट नं. ११६ मधील इमारतीचे दोन मजले, तर गट नं. १३८ मधील पारस कासलीवाल यांच्या इमारतीच्या एका अतिरिक्त मजल्यावर कर्मचाऱ्यांंनी हातोडा चालविला. नगर परिषदेच्या कारवाईने ३५० अतिरिक्त बांधकाम इमारतींपैकी ‘अबतक २८’चा आकडा पार केला आहे. अनेकांनी तर अगदी हतबलतेने स्वत:हूनच घरावर हातोडा चालविणे पसंत केले.
साताऱ्याला पोलीस छावणीचे रूप
सातारा परिसरात दंगाकाबू वज्र व्हॅन, सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलीस अधिकारी, महिला पोलीस, चार ब्रेकरचे ट्रॅक्टर, जेसीबी मशीन व ४४ हातोडे, असा ताफा फिरतो. ज्या कामांना नोटिसा दिल्या आहेत, त्यापैकी एकावर हातोड्याचे घाव सुरू होतात. पोलिसांच्या बंदोबस्तात नगर परिषदेचे अतिक्रमण हटाव पथक पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरत आहे. दररोज सकाळी १० वाजेनंतर बीड बायपासने फौजफाटा निघतो, त्यावेळी एकमेकांना फोन करून विचारपूस केली जाते, ‘अरे तुमच्या कॉलनीत आले का, आमच्याकडून निघाले. आम्ही आज वाचलो’, असा प्रकार सुरू आहे.
जनतेच्या सेवेसाठी काही कर्मचारी कार्यालयात
सातारा-देवळाई नगर परिषदेचे सर्वच कर्मचारी तोडफोडीच्या कामात गुंतल्याने नागरिकांची कैफियत ऐकण्यास कोणीच नसल्याची ओरड नागरिकांतून वाढल्याने अखेर नगर परिषदेत महत्त्वाची कामे सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोडफोड पथकातून वगळण्यात आले आहे. पाणीपुरवठा हाच महत्त्वाचा विषय असल्याने नागरिक गाऱ्हाणी मांडत आहेत. ४ टँकरच्या फेऱ्या नेमक्या जातात कुठे, असा सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Web Title: So far, 28 buildings have been damaged in Satara