धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:30 IST2025-08-20T18:21:12+5:302025-08-20T18:30:02+5:30

अजूनही लहान मुलींना अडकविले जाते लग्नबंधनात

Shocking! Child marriage of 29 girls prevented in four months in Chhatrapati Sambhajinagar district | धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही बालविवाह लावले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. महिला व बालविकास विभागाने यावर्षी दि. १ एप्रिल २०२५ ते आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल २९ मुलींना बालवधू बनण्यापासून रोखले. देश प्रगतीच्या दिशेने जात असताना अजूनही ग्रामीण भागात मुलींचे कमी वयात लग्न लावण्याचा प्रयत्न होते असल्याचे वास्तव उघडकीस आले.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक नऊ बालविवाह रोखले गेले. पैठण व फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, खुलताबादमध्ये बालविवाह रोखण्यात आले. सोयगाव तालुक्यात कोणतेही प्रकरण नोंदविले गेले नाही. बालविवाह प्रक्रिया थांबविण्यात महिला व बालविकास विभागासोबत स्थानिक पोलिस, ग्रामपंचायत, शिक्षक, आशा वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेकवेळा गावातील सजग नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथके घटनास्थळी दाखल होऊन विवाह थांबविण्यात यश आले.

बालविवाह का धोकादायक?
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट थांबते, अल्पवयात मातृत्व आल्याने मुलींच्या आरोग्याला गंभीर धोके निर्माण होतात. तसेच मानसिक, सामाजिक व आर्थिक अडचणींना कुटुंबांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध फक्त कायदेशीर कर्तव्य नसून समाजाच्या विकासासाठी आवश्यक पाऊल आहे.


‘लोकमत’शी बोलताना ‘बालविवाह हा गुन्हा असून, प्रत्येकाने अशा प्रथेला थारा देऊ नये. मुला-मुलींना शिक्षण व सक्षम भविष्य देणे ही पालकांची खरी जबाबदारी आहे,’ असे महिला व बालविकास विभागाकडून आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बालविवाह रोखण्यासाठी शाळांमधून जनजागृती, गावागावात मोहिमा, तसेच हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारी यामुळे अनेक तालुक्यांमध्ये बालविवाह थांबविण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनापर्यंत माहिती नाही

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्यात येत आहे. निनावी फोनमुळे असे प्रकार उजेडात येतात. पण असे अनेक विवाह होत आहेत, ज्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचतच नाही. ग्रामीण भागात मागील दोन वर्षांत झालेल्या लग्नामध्ये अनेक विवाहिता बालवधू आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी
छत्रपती संभाजीनगर- ०९

पैठण-६
गंगापूर- ३

वैजापूर-२
कन्नड-२

खुलताबाद-१
फुलंब्री-४

सिल्लोड-२
एकूण- २९

 

Web Title: Shocking! Child marriage of 29 girls prevented in four months in Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.