- सुमित डोळेछत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात एक हायवा व मोठ्या डीजेची गाडी अडकून शुक्रवारी दुपारी ४:३० ते ६:३० अशी तब्बल अडीच तास वाहने अडकली. पोलिसांवर शिवाजीनगर-देवळाई मार्ग बंद करून वाहनचालकांना परत माघारी पाठवण्याची वेळ आली. तर देवळाई चौक ते शिवाजीनगर चौकाच्या पुढे मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागल्याने तळपणाऱ्या उन्हात नागरिक, वाहतूक पोलिसांना प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे दोन ते तीन तास मनस्ताप सहन करावा लागला.
नागरिकांनी १४ वर्षे या भुयारी मार्गासाठी लढा दिला. या परिसरात जवळपास ३२ वसाहतींमध्ये पाच लाख नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग चार शासकीय विभागांच्या विसंवादामुळे डोकेदुखी ठरत आहे. अडचणींचे ‘आदर्श’ उदाहरण बनलेला हा मार्ग शुक्रवारी पुन्हा एकदा तब्बल अडीच तास बंद करण्याची वेळ पोलिसांवर आली. वाहतूक पोलिसांनी मनाई करूनही हायवा चालक व डीजे चालकाने भुयारी मार्गात गाडी घातली. मात्र, पुढे दोन्ही वाहने मध्येच अडकली. दोन्ही रिव्हर्स घेऊन बाहेर काढेपर्यंत लांबपर्यंत वाहने खोळंबली होती. वाहतूक पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी धाव घेत सहा अंमलदारांच्या मदतीने ही कोंडी सोडवली.
अडचणी काय?- भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान जड, अवजड वाहनांचा विचारच केला गेला नाही. रोज किमान १़० पेक्षा अधिक वेळा वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे हा भुयारी मार्ग ‘नसून अडचण असून मनस्ताप’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.- शिवाजीनगरच्या दोन्ही दिशेला जड, अवजड वाहनांना वळण घेण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने मंदगतीने वाहतूक.- चौकाच्या दोन्ही दिशेला रिक्षाचालक, दुकानांसमोर वाहने रस्त्यावरच उभी राहतात.- जड, अवजड वाहनांसह वाळूच्या हायवांची भरदिवसा येथून ये-जा होते. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावतो.- देवळाई चौकात वाहतूक बेट नसल्याने वाहने अडकतात.
तीनवेळा पत्रव्यवहार मात्र दुर्लक्ष- भुयारी मार्गात रोज जड, अवजड वाहनांचा बेकायदेशीर प्रवेशच वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत असल्याने दोन्ही बाजूंच्या लोखंडी कमानीची उंची कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अभियंत्यांना तीनवेळा स्मरणपत्रे पाठवली. ८ एप्रिल रोजी रात्रीतून लोखंडी कमान बसवली देखील. मात्र, कमकुवत बसवल्याने चार तासांत ती तुटली.- शिवाजीनगर, देवळाई चौकात वाहतूक नियोजनासाठी चार वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात असतात. अवजड वाहनांना बंदी घालून त्यांना शहानूरमियाँ दर्गा चौकातून वळवावे, जेणेकरून शिवाजीनगरकडून मुकुंदवाडीच्या दिशेने वळण घेणाऱ्या वाहनांना कमी वेळ लागून भुयारी मार्गातील वाहतुकीचा भार कमी होईल. शिवाय, जड-अवजड वाहनांना बंदी असल्याचे लोखंडी साइनबोर्ड दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.
उड्डाणपुलाची मागणी ते भुयारी मार्ग लोकार्पणापर्यंतची प्रक्रिया- २०११ पासून सात वर्षे नागरिकांचा शिवाजीनगर चौकात उड्डाणपुलासाठी संघर्ष.- २०१४ मध्ये उड्डाणपूल शक्य नसल्याचे विभागांनी सांगितल्याने भुयारी मार्गाचा पर्याय.- २०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल.- २०२१ मध्ये न्यायालयाच्या आदेशावरून चार विभागांची समिती स्थापन.- ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात.- १५ ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन.- १४ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकार्पण.
असा आहे भुयारी मार्ग- जवळपास २५ कोटींची गुंतवणूक.- ६.९२ कोटींत जवळपास १,८०० चौरस मीटर जागेचे भूसंपादन.- संपूर्ण भुयारी मार्ग २२.७६ मीटर लांब व ३.५ मीटर उंच.
खासदारांनी मार्ग बदललायापूर्वी महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शिवाजीनगर भुयारी मार्गाची पाहणी करून अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. मनपात बैठकही घेतली. मात्र, उपाययोजना झाल्या नाहीत. शुक्रवारी वाहतूक खोळंब्यात खासदार संदीपान भुमरे यांचा ताफा अडकण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी दुरूनच मार्ग बदलला.
Web Summary : Shivaji Nagar underpass faces frequent traffic jams due to heavy vehicles and poor planning. A recent incident trapped vehicles for hours, highlighting the underpass's design flaws and lack of enforcement, causing public distress.
Web Summary : शिवाजी नगर अंडरपास भारी वाहनों और खराब योजना के कारण यातायात जाम का सामना कर रहा है। हाल ही की घटना में वाहन घंटों तक फंसे रहे, जिससे अंडरपास की डिजाइन और प्रवर्तन की कमी उजागर हुई, जिससे जनता को परेशानी हुई।