साडेतीन हजार प्रलंबित फायलींचा निपटारा सुरू
By Admin | Updated: November 2, 2014 00:24 IST2014-11-02T00:19:04+5:302014-11-02T00:24:15+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात प्रलंबित असलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या फायलींचा निपटारा सुरू झाला आहे.

साडेतीन हजार प्रलंबित फायलींचा निपटारा सुरू
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात प्रलंबित असलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या फायलींचा निपटारा सुरू झाला आहे. सध्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त फायली प्रलंबित असून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांचे गठ्ठे पडले आहेत.
सेतू सुविधा केंद्रात दररोज विविध प्रमाणपत्रांसाठी शेकडो अर्ज दाखल होतात. यामध्ये रहिवासी, उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व, भूमिहीन, महिला आरक्षण अशा विविध प्रमाणपत्रांचा यात समावेश आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर ठराविक मुदतीत ही प्रमाणपत्रे मिळणे आवश्यक असते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना ही प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. संपूर्ण जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे प्रमाणपत्रांवर सह्या करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नव्हते, त्यामुळे या काळात तब्बल साडेतीन हजार प्रमाणपत्रांच्या फायली रखडल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आता अधिकाऱ्यांनी या फायलींचा निपटारा सुरू केला आहे. तहसील आणि उपविभागीय कार्यालयातील अधिकारी या फायलींवर स्वाक्षऱ्या करीत आहेत. सध्या दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये या फायलींचे गठ्ठे साचले आहेत.