वैजापूरच्या जलसिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावू
By Admin | Updated: August 19, 2014 02:17 IST2014-08-19T01:55:43+5:302014-08-19T02:17:33+5:30
वैजापूर : तालुक्यातील रामकृष्ण उपसा गोदावरी जलसिंंचन योजनेसह रस्ते व नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याबाबतचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडून तात्काळ

वैजापूरच्या जलसिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावू
वैजापूर : तालुक्यातील रामकृष्ण उपसा गोदावरी जलसिंंचन योजनेसह रस्ते व नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याबाबतचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडून तात्काळ मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी वैजापूर येथे दिली.
येथील केंद्र शासनपुरस्कृत लहान व मध्यम शहराच्या पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत ४० कोटी रुपये खर्चून शहरासाठी वैजापूर नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ व अग्निशमन केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला, याप्रसंगी मंत्री राजेंद्र दर्डा बोलत होते. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे, मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन बन्सीभाऊ संचेती, जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जे. के. जाधव, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, एस. टी. महामंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष मनसुख झांबड, तालुकाध्यक्ष भगवान तांबे, विलास औताडे, मनपा नगरसेवक दामूअण्णा शिंदे, एस. एस. सी. बोर्डाचे संचालक किरण पाटील, अॅड. प्रमोद जगताप, राजूसिंह राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जिल्ह्यात पर्जन्यमान कमी असल्याने दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून दुष्काळी भागांना न्याय मिळेल. गेल्या १३ वर्षांत वैजापूर नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मराठवाड्यातील अत्याधुनिक स्वयंचलित पद्धतीचे हे पहिले जलशुद्धीकरण केंद्र आहे. याशिवाय अग्निशमन केंद्र, उद्यान, सुशोभित स्मशानभूमी व दवाखाना या नगरपालिकेच्या जमेच्या बाजू असून शहरवासीयांना त्याचा मोठा फायदा होत आहे. या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन पक्षाची ताकद वाढविली पाहिजे. डॉ. दिनेश परदेशी यांनी आता तालुका सांभाळावा, असे सांगून वैजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसचीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणून कामे करण्यासाठी हक्काचा आमदार विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अब्दुल सत्तार म्हणाले, तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सहकारमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. याशिवाय रामकृष्ण उपसा गोदावरी जलसिंचन योजनेचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मार्गी लावण्याचे आश्वासन सत्तार यांनी दिले. तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याअंतर्गत दोन धरणांची कामे अद्याप बाकी आहेत. दोन्ही तालुक्यांना ११.५ टी. एम. सी. पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत पूर्ण सिंचन होणार नसल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी प्रास्ताविकात शहरात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी शहरात राबविलेल्या योजना या राजेंद्र दर्डा व अब्दुल सत्तार यांच्या सहकार्यामुळेच कार्यान्वित झाल्याचे सांगितले.
तालुक्यातील मन्याड साठवण तलावातील पाणी शहरवासीयांसाठी आरक्षित करावे, विनायक सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा, नांमकाचे पाणी टेल टू हेड सातत्याने द्यावे, रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावावा व वैजापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी परदेशी यांनी केली.
बाळासाहेब संचेती यांनी गेल्या १३ वर्षांत नगरपालिकेने शहरात ७० कोटींची विकासकामे केली असल्याचे सांगितले. प्रारंभी राजेंद्र दर्डा व अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फीत कापून जलशुद्धीकरण केंद्र, अग्निशमन केंद्राचे उद्घाटन झाले. सूत्रसंचालन गिरीश बापट यांनी केले. आभार मजीद कुरेशी यांनी मानले.
मंत्री अब्दुल सत्तार आपल्या भाषणात म्हणाले की, वैजापूर नगरपालिकेने अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्राचा राज्यात पहिला प्रयोग केला. हा वैजापूर पॅटर्न म्हणून ओळखण्यासाठी राजेंद्र दर्डा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडावा, त्यामुळे सर्व राज्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळेल. सत्तार यांनी पेट्रोल दरवाढ, रेल्वे भाडेवाढीबाबत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. दरवाढ करून जर अच्छे दिन येत असतील तर आम्हाला असे अच्छे दिन नको आहेत.