राजूर-पैठण रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर

By Admin | Updated: March 14, 2016 00:34 IST2016-03-14T00:15:00+5:302016-03-14T00:34:27+5:30

जालना : राजूर ते पैठण रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय राखीव निधीतून ७० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी तीन मार्गांचा अभ्यास केला जात असून,

Rs. 70 crores sanctioned for Rajur-Paithan road | राजूर-पैठण रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर

राजूर-पैठण रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर



जालना : राजूर ते पैठण रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय राखीव निधीतून ७० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी तीन मार्गांचा अभ्यास केला जात असून, ज्या मार्गावर सर्वाधिक गावे असतील वा वर्दळ असेल असा मार्ग निश्चित केला जाईल. तसेच जालना शहरताील रस्ते काँक्रिटीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच या रस्त्यांचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दानवे म्हणाले, जालना शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कॉँक्रीटीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच्या प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच शहरातील उर्वरित अंतर्गत रस्त्यांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही दानवे यांनी सांगितले. रखडलेल्या लोअर दूधना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडे २४५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जाईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. तसेच नांदूर-मधमेश्वर धरणासाठी ३५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गतच्या विविध कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सिमेंट बंधारे बांधण्यात येतील. तसेच मराठवाड्यात जलयुक्तची कामे करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून ३६ पोकलेन मशिन घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध नद्यांचे या कामांसाठी सर्व्हेक्षण सुरु असून अंतिम यादी लवकरच तयार केली जाईल, अशी माहिती दानवे यांनी दिली.
अग्रसेन चौक ते बालाजी चौक आणि शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड केबलिंग केली जाणार आहे. यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाल्याचे दानवे म्हणाले. या कामामुळे या परिसरात तारांचे जाळे दूर होणार आहे. रस्ते मोकळे राहणार आहेत. आरएपीडीआरपी योजनेंतर्गत शहरासाठी ३०० ट्रान्सफार्मर मंजूर झाले असून पैकी २५० ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. उर्वरित लवकरच बसविण्यात येतील.

Web Title: Rs. 70 crores sanctioned for Rajur-Paithan road