घाटीतील निवासी डॉक्टरांचा आज संप
By Admin | Updated: August 23, 2014 00:49 IST2014-08-23T00:34:54+5:302014-08-23T00:49:37+5:30
घाटीतील निवासी डॉक्टर २३ आॅगस्ट रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत.

घाटीतील निवासी डॉक्टरांचा आज संप
औरंगाबाद : प्राध्यापकांच्या त्रासाला कंटाळून सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टराने आत्महत्या केली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्या डॉक्टरच्या कुटुंबाला शासनाने ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, निवासी डॉक्टरांना केवळ आठ तासच ड्यूटी द्यावी, इ. मागण्यांसाठी घाटीतील निवासी डॉक्टर २३ आॅगस्ट रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेने या संपाचे आयोजन केले आहे. संपाविषयी अधिक माहिती देताना घाटीतील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश नलगे यांनी सांगितले की, घाटीमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ३५ पदे मंजूर आहेत. मात्र, केवळ या पदासाठी शासनाने अनुदान मंजूर केले नाही. त्यामुळे ही पदे मंजूर असूनही रिक्तच ठेवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमताही कमी होते. परिणामी आहे त्याच निवासी डॉक्टरांवरील कामाचा बोजा वाढतो. निवासी डॉक्टरांना केवळ आठ तास काम दिल्यास ते आपल्या अभ्यासासाठी लक्ष देऊ शकतील आणि रुग्णांनाही उत्कृष्ट सेवा देतील. त्यामुळे वैद्यकीय शिक्षकांची पदे भरण्याची मागणीही मार्डने केली आहे. घाटीतील २४० निवासी डॉक्टर शनिवारी एक दिवसाच्या संपात सहभागी होणार आहेत. त्याबाबतची नोटीस आधीच आम्ही प्रशासनाला दिली असल्याचे डॉ. नलगे यांनी सांगितले.