मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर ते पुणे 'ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे'लगतच रेल्वेमार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:03 IST2025-08-11T16:02:36+5:302025-08-11T16:03:43+5:30
छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेलगत नागपूर ते पुणे रेल्वेमार्ग केला तर नागपूर ते पुणे रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल.

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर ते पुणे 'ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे'लगतच रेल्वेमार्ग
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे होत आहे. त्यालगतच नागपूर ते पुणे लोहमार्ग करता आला तर रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात जाहीर केले.
अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा आहे. त्याच्या पलीकडे पुण्याहून तीन लाईन आहेत. त्या पाच लाईन करण्याचे काम सुरू आहे. सोबत जेएनपीटी पोर्ट अशी कनेक्टिव्हिटी करावी. मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याशी चर्चा झाली आहे. हे झाले तर नवीन माल वाहतूक कॉरिडोर तयार होईल. नागपूर येथे याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, एक अलाइनमेंट तयार केली आहे. त्या अलाइनमेंटची ऑफर रेल्वेला देऊ. भूसंपादन सध्या गती घेणारच आहे. रेल्वे आणि रस्ता हे दोन्ही एकत्रित झाले तर नव्याने एकत्रित भूसंपादनाचा विचार होईल. छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा एक्स्प्रेस वे होत आहे. त्याच्याच लगत नागपूर ते पुणे रेल्वेमार्ग केला तर नागपूर पुणे रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल.
संभ्रम कसा दूर होणार?
मुख्यमंत्री संयुक्त अलायनमेंट करून छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा लोहमार्ग एकत्रित करण्याचे सांगत आहेत. दुसरीकडे खा. डॉ. कराड यांनी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर लोहमार्गाचा डीपीआर झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार आहे, याबाबत जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रस्ता व लोहमार्ग सोबतच
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाचे काम एमएसआयडीसी करणार आहे. त्याचे भूसंपादन लवकरच होणार आहे. या भूसंपादनातच नागपूर ते पुणे रेल्वेमार्गाचे भूसंपादन झाले तर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हे अलायनमेंट त्या मार्गावर शिफ्ट होईल.
- डॉ. भागवत कराड, खासदार