पीएच.डी. पेट’ साठी विद्यापीठ यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: August 19, 2014 02:17 IST2014-08-19T01:57:29+5:302014-08-19T02:17:25+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २८ सप्टेंबर रोजी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) घेतली जाणार असून,

पीएच.डी. पेट’ साठी विद्यापीठ यंत्रणा सज्ज
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २८ सप्टेंबर रोजी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) घेतली जाणार असून, परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी विद्यापीठाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. असे असले तरी संशोधनासाठी शिल्लक जागांचा प्रश्न अनुत्तरित आहे.
यास विद्यापीठाच्या वरिष्ठ सूत्रांनी दुजोरा दिला असून, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेली पेट परीक्षेची संपूर्ण तयारी जवळपास पूर्ण होत आली असल्याचे कळविले आहे. एकूण ५३ विषयांसाठी २८ सप्टेंबर रोजी ही परीक्षा होईल.
‘पेट’साठी ९ हजार २१६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे.
‘पेट’चा शंभर गुणांचा पहिला पेपर हा सर्व विद्यार्थ्यांसाठी समान राहील. दुसरा पेपर हा स्पेसिलायझेशनचा असेल. तोही शंभर गुणांचा पेपर असेल. एकूण २०० गुणांची ही परीक्षा घेतली जाणार असून, विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेच्या छपाईचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एकीकडे पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात, तर दुसरीकडे ‘पेट’ अभावी त्यांना संशोधनास मुकावे लागते.
यूजीसीकडे विविध फेलोशिपचा निधी दरवर्षी विद्यार्थ्यांअभावी पडून राहतो. ‘पेट’ झालीच तर पुढे विद्यापीठातील मार्गदर्शकांकडे संशोधनासाठी जागाच शिल्लक नसतात. त्यामुळे ‘पेट’ उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांच्या प्रतीक्षेत राहावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठालाच पुढाकार घ्यावा लागेल, अशी संशोधक विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार देशभरातील सर्व विद्यापीठांना २००९ पासून ‘पेट’ अनिवार्य करण्यात आलेली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच संशोधनासाठी पात्र समजले जाते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २००९ मध्ये पहिली ‘पेट’ घेतली.
त्यानंतर २०१२ साली दुसरी परीक्षा झाली. त्यानंतर आजपर्यंत ‘पेट’ला येनकेन प्रकारेण मुहूर्तच लागला नव्हता. डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी वर्षातून किमान दोन ‘पेट’ झाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली.